सामाजिक

“डिजिटल विश्रांतीचा धाडसी प्रयोग!” – विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जवळा गावाचा ऐतिहासिक निर्णय

“डिजिटल विश्रांतीचा धाडसी प्रयोग!” – विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जवळा गावाचा ऐतिहासिक निर्णय

२५ फेब्रुवारीपासून दररोज सायं. ७ ते रात्री ९ – मोबाईल, टीव्हीसह सर्व डिजिटल स्क्रीन पूर्णपणे बंद

सांगोला (तालुका प्रतिनिधी): स्मार्टफोन आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे समाजजीवनावर होत असलेल्या परिणामांची गंभीर दखल घेत सांगोला तालुक्यातील जवळा गावाने एक आदर्शवत आणि धाडसी पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत गावात मोबाईल, टीव्ही तसेच सर्व डिजिटल स्क्रीन पूर्णपणे बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
युवा नेते ॲड. यशराजे साळुंखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला सरपंच सज्जन मागाडे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मूर्त रूप दिले. उपसरपंच नवाज खलिफा, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, महिला आणि नागरिकांच्या सहकार्याने हा निर्णय सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला.

सध्या विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्य, अभ्यास आणि वर्तणुकीवर होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स आणि मनोरंजनाच्या आकर्षणामुळे अनेक विद्यार्थी दिवसातील पाच ते सात तास मोबाईलवर घालवत असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिडेपणा, झोपेच्या समस्या अशा तक्रारी वाढताना दिसत आहेत. विशेषतः रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरामुळे झोपेचे चक्र विस्कळीत होते आणि त्याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. डोळ्यांचे विकार, मान-पाठदुखी, डोकेदुखी यांसारख्या समस्या वाढत असल्याने ही बाब चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर गावाने डिजिटल विश्रांतीचा हा प्रयोग राबवण्याचा निर्धार केला आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास नियमित होईल, कुटुंबीयांशी संवाद वाढेल, जेवण व झोपेची वेळ शिस्तबद्ध राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन तासांची डिजिटल विश्रांती ही केवळ तांत्रिक बंदी नसून सामाजिक आरोग्य आणि संस्कारांची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

शैक्षणिक गुणवत्ता आणि आरोग्य सुधारण्यास मदत
सोशल मिडियाच्या आभासी जगामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे, संवादात घट अशा समस्या निर्माण होत आहेत. दररोज दोन तास डिजिटल स्क्रीन बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळेल, कुटुंबीयांशी संवाद वाढेल आणि मानसिक आरोग्य सुधारेल. जवळा गावाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, सांगोला तालुक्यातील इतर गावांनीही या प्रयोगाचे अनुकरण करावे, असे आवाहन ॲड. यशराजे साळुंखे पाटील यांनी केले आहे.
हा प्रयोग ग्रामीण भागात डिजिटल शिस्तीचा नवा आदर्श निर्माण करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जवळा गावाने घेतलेला हा निर्णय सामाजिक जाणीव आणि जबाबदारीचे उदाहरण ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!