मराठ्यांचं वादळ मुंबईत मंत्रालयाच्या दारात पोहोचले….
आता आश्वासन नको, आरक्षण हवं, मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेले मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आजपासून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर मोर्चाला बसले आहेत. शुक्रवारी पहाटेच मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो वाहनांनी मुंबईमध्ये प्रवेश केला. प्रशासनानेही त्यादृष्टीने तयारी केली असून आझाद मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक दिल्यानंत र२९ ऑगस्ट रोजी मुंबईत भगवं वादळ अवतरलं आहे. आझाद मैदान काही मिनिटांमध्येच भरल्यानंतर आंदोलकांनी मिळेल त्या रिकामी जागी आसरा घेण्यास सुरुवात केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेले अनेक आंदोलक भिजू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावले. दरम्यान, मराठा आंदोलकांनी मंत्रालयाकडे सुद्धा मोर्चा वळवत घोषणाबाजी केली. मंत्रालयासमोर शेकडो आंदोलक जमले होते.
न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. निदर्शकांची संख्या 5 हजार पेक्षा जास्त नसावी अशीही अट घालण्यात आली आहे. तरीही, राज्याच्या विविध भागातून लोक मुंबईत पोहोचू लागले आहेत आणि वातावरण आधीच तापले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र आणि केंद्र सरकार या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे. कारण हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. दरम्यान, जरांगे यांची मुख्य मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी जात म्हणून मान्यता मिळावी. जर मराठ्यांना हा दर्जा मिळाला तर त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळू शकेल.
आता आश्वासन नको, आरक्षण हवं अशी मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया असून आता थापा ऐकायच्या नाही, ओबीसीमधून मराठा आरक्षण हवं, वर्षभर इथे बसावं लागलं तरी चालेल, मात्र मागे हटणार नाही असा इशारा दिला आहे. मुंबईच्या आझाद मैदानात भगवं वादळ उभं राहिलं आहे. मनोज जरांगे यांच्यावर स्तुतीसुमने ऊधळणाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू, मागे हटला नाही हटणार नाही, नेता लय खंबीर, तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर अशा गाण्यांनी सुरुवात झाली आहे. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. हे संपूर्ण आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणि सरकारचं त्यावर काय उत्तर असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.