टेंभू व म्हैसाळच्या पाणी वाटप नियोजन बैठकीत सांगोल्याच्या हक्काच्या पाण्यासाठी दिपकआबांची आक्रमक भूमिका
सांगोल्याच्या हक्काचे पााणी १५ नोव्हेंबर पासून टेल टू हेड पद्धतीने सोडण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आश्वासन

टेंभू व म्हैसाळच्या पाणी वाटप नियोजन बैठकीत सांगोल्याच्या हक्काच्या पाण्यासाठी दिपकआबांची आक्रमक भूमिका
सांगोल्याच्या हक्काचे पााणी १५ नोव्हेंबर पासून टेल टू हेड पद्धतीने सोडण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आश्वासन
सांगोला (तालुका प्रतिनिधी): चालू वर्षी प्रचंड मोठ्या दुष्काळामुळे खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर शेतीच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचे आणि अन्नधान्याचे भीषण संकट उभा ठाकले आहे. दुष्काळी सांगोला तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी तसेच शेतीसाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी १५ नोव्हेंबर पासून टेंभू उपसा सिंचन योजना व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना दिले.
टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणी वाटप नियोजनाची बैठक गुरुवर दि. २९ ऑक्टोबर रोजी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली या बैठकीस राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह अन्य आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नावरून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत चालू वर्षी प्रचंड दुष्काळ असल्याने तालुक्यातील शेतकरी पशुधन आणि पशुपक्षीही तहानलेले आहेत. त्यामुळे सरकारने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत पाहू नये १५ नोव्हेंबर पासून चालू होणारे आवर्तन सांगोला तालुक्याला प्राधान्य देऊन नियमाप्रमाणे टेल टू हेड पद्धतीने सोडावे. तसेच टेंभू योजनेतून मान नदीत पाणी सोडावे आणि म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून मान आणि कोरडा या दोन्ही नद्या वरील सर्व बंधारे तसेच सांगोला तालुक्यातील छोटे मोठे सर्व तलाव भरून द्यावेत अशी आक्रमक भूमिका सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे टेंभू व म्हैसाळ उपसासिंचन योजनेच्या नियोजन बैठकीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी घेतली. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला नियमाप्रमाणे प्राधान्य देऊन टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.
चालू वर्षी प्रचंड दुष्काळ असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दारात असणारी जनावरे ही भुकेने हंबरडा फोडू लागली आहेत अशा परिस्थितीत १५ नोव्हेंबर पासून टेंभू आणि म्हैसाळ योजनेला पाणी आल्यास तालुक्यातील तहानलेल्या शेतकऱ्यांना व भुकेलेल्या जनावरांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. तालुक्यातील पाणी प्रश्नावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पाणीवाटप नियोजन बैठकीत आक्रमक आणि ठाम भूमिका घेतल्याने त्यांच्या या भूमिकेचे तालुक्यातील जनतेतून कौतुक होत आहे.
टेंभू आणि म्हैसाळ या दोन्ही उपसा सिंचन योजनेत सांगोला तालुका हा टेलला आहे. नियमाप्रमाणे टेल टू हेड पाणी न सोडल्याने तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी नेहमीच आम्हाला संघर्ष करावा लागतो सांगोला तालुक्यात पाणी पोहोचेपर्यंत वरून बंद केले जाते. म्हणून यंदा नियमाप्रमाणे टेल टू हेड पद्धतीने टेंभू व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे पाणी सोडण्यात यावे तसेच टेंभू आणि म्हैसाळ या पंप हाऊसेस साठी राखीव मोटार तयार ठेवाव्यात. सांगोला तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.- दिपकआबा साळुंखे पाटील
माजी आमदार, सांगोला.



