पुणे विभागीय कबड्डी स्पर्धेत जवळे विद्यालयाच्या मुलींची बाजी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

पुणे विभागीय कबड्डी स्पर्धेत जवळे विद्यालयाच्या मुलींची बाजी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सांगोला (तालुका प्रतिनिधी): विद्यामंदिर, सांगोला येथे आयोजित पुणे विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.आण्णासाहेब घुले (सरकार) कनिष्ठ महाविद्यालय, जवळे येथील १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले. या यशाच्या जोरावर संघाची राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जवळे विद्यालयाच्या मुलांच्या कबड्डी संघाने चार वेळा विभागीय स्पर्धेपर्यंत मजल मारली होती. मात्र, विद्यालयाच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच मुलींच्या कबड्डी संघाने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे.
स्पर्धेत जवळे विद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्ट सांघिक खेळ, चपळता, जिद्द आणि नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. खेळाडूंनी दाखवलेली चिकाटी, आत्मविश्वास आणि सांघिक समन्वय यांच्या जोरावर संघाने प्रथम क्रमांक मिळवत प्रशालेच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय लिहिला. मुलांच्या संघाच्या विभागीय स्तरावरील यशस्वी वाटचालीनंतर मुलींनीही आपल्या कामगिरीने विद्यालयाच्या क्रीडा वैभवात भर घातली आहे. या यशासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रा.ए.के. पाटील, विजय चडचणकर, विजय लांडगे आणि कुलभूषण देशमुख यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी नियमित सराव, शिस्त, मेहनत आणि सांघिक भावनेच्या जोरावर हे यश संपादन केले.
विद्याविकास मंडळ, जवळेचे अध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, उपाध्यक्ष अरुण घुले आणि सचिव सुभाष लऊळकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्य बाळासाहेब शिंदे, उपमुख्याध्यापक प्रशांत गोरे आणि पर्यवेक्षक संतोष शेटे यांनी खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे कौतुक केले.ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्येही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे जवळे विद्यालयाच्या मुलींनी सिद्ध केले आहे. मुलांच्या संघाने यापूर्वी विभागीय स्तरापर्यंत केलेली वाटचाल आणि आता मुलींनी मिळवलेले ऐतिहासिक यश यामुळे विद्यालयाच्या कबड्डी क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून जवळे विद्यालयाचे, गावाचे आणि सांगोला तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्याची संधी या मुलींना मिळाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाचे प्राचार्य बाळासाहेब शिंदे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.