राजकीय

भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेच्या अडचणीत आणखी वाढ! ८ लाख ६९ हजारांच्या फसवणुकीप्रकरणी करमाळ्यात गुन्हा दाखल

मुलीच्या विवाहाचे भविष्य आणि पत्नीला उपसरपंच करण्याचे आमिष

भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेच्या अडचणीत आणखी वाढ! ८ लाख ६९ हजारांच्या फसवणुकीप्रकरणी करमाळ्यात गुन्हा दाखल

मुलीच्या विवाहाचे भविष्य आणि पत्नीला उपसरपंच करण्याचे आमिष

सांगोला (प्रतिनिधी): स्वतःला बाळूमामाचा अवतार आणि दैवी शक्ती असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या भोंदू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल उर्फ नाथबाबा वाघमारे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुलीच्या विवाहाबाबत भविष्य सांगणे, पत्नीला उपसरपंच करण्यासाठी विशेष पूजा करण्याचे आमिष दाखवणे आणि फ्लॅटच्या भाडे व डिपॉझिटच्या व्यवहारातून एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ८ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून करमाळा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे दैवी शक्ती, भविष्यकथन आणि अघोरी पूजेच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, संबंधित आरोपींच्या टोळीविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी परिसरात कुटुंबासह राहतात. त्यांच्या मुलीच्या विवाहाबाबत आणि भविष्याबाबत माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने ते नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोहर उर्फ मामा भोसले याच्याकडे गेले होते. त्यावेळी आरोपीने आपल्या मठातील काम पाहणाऱ्या विशाल वाघमारे याच्या माध्यमातून फिर्यादींकडून पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादींच्या मुलीचे लग्न होईल आणि त्यांच्या पत्नी उपसरपंच होतील, असे सांगण्यात आले. यासाठी प्रत्येक अमावस्येला पाच वेळा उंदरगाव येथील मठात येण्यास सांगितले.

फिर्यादी अमावस्येला उंदरगाव येथील मठात गेले असता, आपण बाळूमामाचा अवतार असून आपल्यामध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा आरोपी मनोहर भोसले याने केला. फिर्यादींच्या पत्नीला उपसरपंच करण्यासाठी मठात पूजा करावी लागेल, असे सांगून आरोपीने एक लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादींच्या नावाने पूजा केली असून आता कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणातील फसवणुकीचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे फ्लॅटच्या भाड्याचा व्यवहार. आरोपींनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मांजरी परिसरात राहायचे असल्याचे सांगून फिर्यादींच्या साईबालाजी इमारतीतील दोन फ्लॅट भाड्याने घेतले. या दोन्ही फ्लॅटचे मासिक भाडे प्रत्येकी १२ हजार रुपये आणि डिपॉझिटची रक्कम २० हजार रुपये ठरले. मात्र, एकूण ६३ महिन्यांचे भाडे आणि डिपॉझिटची रक्कम फिर्यादींना देण्यात आली नाही.

भविष्यकथन आणि पूजेच्या नावाखाली पैसे घेणे तसेच फ्लॅटच्या भाडे व डिपॉझिटच्या व्यवहारातील कथित अनियमितता या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता फिर्यादींची एकूण ८ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ९१७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ मधील कलम ३(१) व ३(३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मनोहर उर्फ मामा भोसले आणि विशाल उर्फ नाथबाबा वाघमारे यांच्याविरुद्ध यापूर्वीही कारवाई झालेली असून, त्यांच्या टोळीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या नव्या गुन्ह्यामुळे संबंधित प्रकरणातील तपासाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.

या गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. आणि करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बालाजी वळसने करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!