ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई! १७ किलो ९९४ ग्रॅम गांजासह तरुणाला अटक

ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई! १७ किलो ९९४ ग्रॅम गांजासह तरुणाला अटक
१५ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त; स्विफ्ट कारमधून गांजाची वाहतूक करताना कारवाई
सोलापूर (प्रतिनिधी): अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने गांजाची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत १७ किलो ९९४ ग्रॅम गांजा, स्विफ्ट कार आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर-मिरज महामार्गावरील इंचगाव टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. शुभम लालासाहेब काळे (वय २८, रा. हरगुळ रेल्वे जवळ बार्शी रोड एमआयडीसी लातूर, सध्या रा. आंबेडकर नगर, अरळी कॉर्नर, जत, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या ‘नशामुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी भर दिला आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी पथके सक्रिय करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल मनोज राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोलापूर-मिरज महामार्गावरून इंचगाव टोलनाक्याजवळून एक व्यक्ती स्विफ्ट कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येत आहे.
या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना माहिती दिली. त्यानंतर जगताप यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कामतीकडून बेगमपूरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले. संशयित स्विफ्ट कारला पकडण्यासाठी इंचगाव टोलनाक्याजवळ सापळा रचण्यात आला. काही वेळातच माहितीतील वर्णनाशी जुळणारी मारुती सुझुकी स्विफ्ट कार (क्रमांक एमएच १० डी क्यू ८८९७) त्या ठिकाणी आली. पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या कारवाई करत कारमधील व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शुभम लालासाहेब काळे असल्याचे सांगितले.
संशयित कारमधील पोत्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, संबंधित व्यक्तीने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये उग्र वास असलेला, ओलसर हिरव्या रंगाचा, पाने, बिया आणि बोंडे असलेला गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी एकूण १७ किलो ९९४ ग्रॅम वजनाचा, ८ लाख ९९ हजार ७०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याशिवाय गांजाच्या वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार आणि मोबाईलही जप्त करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १५ लाख ७९ हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आरोपी शुभम काळे याच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०२/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हा गांजा कोठून आणण्यात आला होता, तो कोणाला विक्रीसाठी किंवा कोणत्या ठिकाणी पोहोचविण्यात येणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, यासह अंमली पदार्थांच्या पुरवठ्याच्या साखळीबाबत तपासातून माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस हवालदार दशरथ गोरे, अविनाश पाटील, रवी माने, अतुल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल अनवर आत्तार, मनोज राठोड, प्रमोद गायकवाड, राहुल दोरकर तसेच कामती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अस्मान शेख आणि पोलीस हवालदार काळजे यांनी सहभाग घेतला.



