“संकटात तुम्ही एकटे नाही… सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे!”
दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर काढणार; शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

“संकटात तुम्ही एकटे नाही… सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे!”
दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर काढणार; शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
सांगोला (प्रतिनिधी): पावसाळा सुरु होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. अद्यापही सोलापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं करपू लागल्याने जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम गेल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी पाहणीचा दौरा केला. बार्शी तालुक्यातील धानोरे आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेली पिके पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या संकटात तुम्ही एकटे नाही….सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढतो’ अशी ग्वाही फडणवीसांनी दिली. आता रब्बीसाठी शक्य ती मदत करू, बळीराजासाठी सर्व काही करू, सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अक्षरशः रडू कोसळले.

पावसाने पाठ फिरवल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक हातचे गेले आहे. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. बार्शी तालुक्यातील धानोरे आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना “या संकटात तुम्ही एकटे नाही, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असा दिलासा देत, येत्या दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर काढून सरसकट व तातडीने मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
१९७२ नंतरचा हा सर्वांत मोठा दुष्काळ आहे, असे सांगत फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. रब्बी हंगामासाठी मदत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा आणि अन्नधान्य उपलब्ध करून देण्याबाबत सरकार तातडीने पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीचे काम सुरू असून, पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीत रोजगाराची समस्या निर्माण होऊ नये यासाठी जलसंधारणासह रोजगाराची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीप्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. “सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतला असून, येत्या तीन दिवसांत दुष्काळाची पहिली अधिसूचना काढण्यात येईल. शासन या गंभीर काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पाणीप्रश्नावर राज्य सरकारने दोन मोठे निर्णय घेतले असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. “पहिल्या टप्प्यात आम्ही पाणी आणण्याला प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर आणि सांगलीचे पुराचे (फ्लड वॉटर) पाणी उजनी धरणात आणून तेथून मराठवाड्याच्या एका भागात नेण्याच्या प्रकल्पाला जागतिक बँकेची पूर्ण मान्यता आणि पैसेही मिळाले आहेत,” अशी मोठी घोषणा त्यांनी केली. तसेच, मराठवाड्याला खऱ्या अर्थाने आणि कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी एका मोठ्या प्रकल्पावर काम सुरू असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत अपेक्षित असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त गावातील पीक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता याची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सर्व काही करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाला पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. वीजबिलाच्या प्रश्नावरही सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे सांगत ४८ हजार कोटी रुपयांची वीजबिलाची रक्कम माफ करण्यात आली असून, पुढेही शेतकऱ्यांवर वीजबिलाचा भार पडू देणार नाही, असे फडणवीस म्हणाले. दुष्काळाच्या संकटातून शेतकरी आणि ग्रामीण भागाला बाहेर काढण्यासाठी सरसकट मदत, तातडीचे निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर सरकारचा भर राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


