सूर्योदय परिवाराकडून आज होणार चार तालुक्यातील रणरागिणींचा सन्मान
कोल्हापूर येथील हास्यसम्राट संभाजी यादव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन

सूर्योदय परिवाराकडून आज होणार चार तालुक्यातील रणरागिणींचा सन्मान
कोल्हापूर येथील हास्यसम्राट संभाजी यादव यांच्या कार्यक्रमाचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी): व्यापक स्वरूपात सामाजिक बांधिलकी जपत आणि समाजातील प्रत्येक घटकांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा गुणगौरव करत विविध प्रकारचे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याची मोठी परंपरा असलेल्या सूर्योदय परिवाराच्या वतीने आज सांगोला येथील सूर्योदय मॉलच्या बाजूस असलेल्या अत्याधुनिक अशा सूर्योदय बँक्वेट हॉलमध्ये दुपारी बारा वाजता सांगोला तालुक्यासह पंढरपूर, मंगळवेढा तसेच मोहोळ तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या रणरागिणींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सूर्योदय महिला अर्बनच्या चेअरमन अर्चनाताई अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.
या सर्व पुरस्कारांचे वितरण भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या सौ.सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी सांगोला पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ.पूनमताई सुदर्शन इंगवले, सौ.रुपमती दीपकराव साळुंखे पाटील, डॉ.सौ.निकिताताई बाबासाहेब देशमुख, पंचायत समितीच्या सदस्या सौ.राणीताई सुरज पाटील आणि नगरसेविका सौ.सुजाता चेतनसिंह केदार सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीअर्चनाताई इंगवले यांनी यावेळी दिली.
विश्वशांतीसाठी आणि जगाच्या निर्मितीसाठी स्त्रियांचे मानवी जीवनात असलेले अनन्य साधारण महत्व अधोरेखित करत त्यांच्या जाणीव जागृती करिता चिंतनीय परंतु अत्यंत विनोदी शैलीत मार्गदर्शन करणारे आणि परिवर्तनशील समाज निर्मितीसाठी प्रबोधन करणारे कोल्हापुर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते संभाजी यादव यांचा ‘हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा’ या विषयावर कार्यक्रम देखील यावेळी संपन्न होणार आहे. कृषीप्रधान देशातील ग्रामीण भागातील बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून पशुधन वाढीसाठी अहोरात्र झटणारी मायमाऊली तसेच शिक्षिका, डॉक्टर,वकील,इंजिनिअर, अधिकारी अशा कोणत्याही पदावर कार्यरत असणारी कर्तुत्व संपन्न स्त्री असो किंवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वकर्तृत्व सिद्ध करणारी सबला असो अशा काही सावित्रीच्या लेकींचा सन्मान दुर्गाशक्ती हा पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.
तसेच मुलगा असो अथवा मुलगी यांना लहानपणापासूनच कर्तुत्वाचे बाळकडू देत कणखर हिरकणीची भूमिका निभावत कर्तुत्व संपन्न पिढी निर्माण करणाऱ्या काही आदर्श मातांना मातृशक्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर अनेक प्रकारची लोकोपयोगी कामे सूर्योदय परिवाराने केली असून ज्या समाजाच्या माध्यमातून आपल्या उद्योग आणि व्यवसायाला आशीर्वादाचे पाठबळ मिळत आहे, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करत सामाजिक बांधिलकी जपण्याची कृतज्ञ भूमिका सूर्योदयने कायमच निभावलेली आहे. नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण तसेच दुष्काळी कार्यास मदत, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, व्यापक स्वरूपातील रक्तदान शिबिरे, अनेक भागात वृक्षारोपण करून राबवलेली शिस्तबद्ध वृक्षसंवर्धन मोहीम अशा अनेक माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना गुणगौरवाची मोठी परंपरा देखील सूर्योदय परिवाराने जपलेली आहे.
दरवर्षी शिक्षक दिन, अभियंता दिन, डॉक्टर्स डे, महिला दिन अशा अनेक विशेष दिनाच्या निमित्ताने बाल दिनापासून ज्येष्ठ नागरिक दिनापर्यंत सर्व घटकातील आदर्शांना सूर्योदय परिवाराच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज संपन्न होणाऱ्या महिला दिन कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी सूर्योदय परिवाराच्या संचालिका सौ. सुरेखाताई लवटे, सौ. ज्योतीताई भगत आणि सौ. मीनाक्षीताई दिघे यांनी केले आहे.



