सांगोल्यात ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी; दिपकआबा गटातील तीन सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची राजकीय खेळी यशस्वी, इतिहासात पहिल्यांदा होणार भाजपचा सभापती

सांगोल्यात ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी; दिपकआबा गटातील तीन सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची राजकीय खेळी यशस्वी, इतिहासात पहिल्यांदा होणार भाजपचा सभापती
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात ‘ऑपरेशन लोटस’ मोहीम यशस्वी ठरली आहे. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटातील तीन पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पंचायत समितीतील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली असून महायुतीला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुरुवार दि. १२ मार्च रोजी सांगोला पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड होणार आहे. त्यापूर्वीच मुंबई येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सदस्या पूनम इंगवले, सदस्य अशोक चोरमुले आणि बापू जावीर यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पंचायत समितीतील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे.
सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, बाळासाहेब एरंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदाची पहिली संधी भारतीय जनता पक्षाला देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढील कार्यकाळात शिवसेनेचा सभापती आणि भाजपचा उपसभापती होईल, असेही ठरविण्यात आले.
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचे ५ तर शेकापचे ६ उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे सभापती निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला होता. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रणनीती आखत तीन सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले. महायुतीच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात भाजपच्या पूनम इंगवले यांची सभापती म्हणून तर शिवसेनेचे अजय सरगर यांची उपसभापती म्हणून निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. या निर्णयामुळे सांगोला तालुक्यातील भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगोल्यात इतिहास; पहिल्यांदाच भाजपचा सभापती
सांगोला पंचायत समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती होणार आहे. जवळा पंचायत समिती गणातील पूनम इंगवले या भाजपच्या पहिल्या सभापती होण्याचा मान मिळवणार आहेत. तर नाझरे गणातून विजयी झालेले शिवसेनेचे अजय सरगर हे उपसभापतीपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे सांगोला पंचायत समितीच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होणार आहे.



