सामाजिक

वाणीचिंचाळेत पोस्ट कार्यालयाचा शुभारंभ; १२ किमी पायपीटीतून गावकऱ्यांची सुटका

वाणीचिंचाळेत पोस्ट कार्यालयाचा शुभारंभ; १२ किमी पायपीटीतून गावकऱ्यांची सुटका

सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील वाणीचिंचाळे येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील, डॉ. निकिता देशमुख व सरपंच प्रियांका गडहिरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या सोहळ्याला पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार, अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, चिदानंद स्वामी, रामलिंग पाटील, लक्ष्मण निळे, दादासाहेब घुणे तसेच बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला तालुक्यातील २१६० लोकसंख्या असलेल्या वाणीचिंचाळे गावातील नागरिकांना यापूर्वी पोस्टाशी संबंधित कामांसाठी तब्बल १२ किलोमीटर अंतर पायी चालत जवळा येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन अनेक कामे विलंबाने होत होती. ही अडचण लक्षात घेऊन सरपंच प्रियांका गडहिरे यांनी चार महिन्यांपूर्वी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे लेखी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत खासदार मोहिते पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गावासाठी पोस्ट कार्यालय मंजूर करून घेतले.

नवीन पोस्ट कार्यालयामध्ये आता बँकेप्रमाणे विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. ‘लाडकी बहीण’ योजना, ‘पीएम किसान’ योजना, घरकुलाचे हप्ते, मनीऑर्डर सेवा तसेच बचत गटांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार गावातच पार पडणार आहेत. यामुळे विशेषतः महिला बचत गटांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १०० आवर्ती ठेव (आर डी) खाती उघडण्यात आली, ज्यातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जितेंद्र गडहिरे यांनी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!