सांगोल्यात २,४०२ किलो निर्माल्य संकलन; पर्यावरण संवर्धनाचा धर्माधिकारी प्रतिष्ठानचा प्रभावी उपक्रम
१,१९७ घरगुती व ७ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन; २११ श्री सदस्यांचा दिवसभर उत्स्फूर्त सहभाग

सांगोल्यात २,४०२ किलो निर्माल्य संकलन; पर्यावरण संवर्धनाचा धर्माधिकारी प्रतिष्ठानचा प्रभावी उपक्रम
१,१९७ घरगुती व ७ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन; २११ श्री सदस्यांचा दिवसभर उत्स्फूर्त सहभाग
सांगोला (प्रतिनिधी): श्री गणेश विसर्जनानंतर नदी, तलाव व जलस्रोतांमध्ये निर्माल्य टाकल्यामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या सौजन्याने सांगोला येथे अनोखा ‘निर्माल्य कलश’ उपक्रम राबविण्यात आला. डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा उपक्रम उत्साहात पार पडला.
सांगोला शहर व परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर निर्माण होणारे हार, फुले, दुर्वा, फळे आदी निर्माल्य पाण्यात विसर्जित न करता त्याचे संकलन करण्यात आले. या उपक्रमातून तब्बल २,४०२ किलोग्रॅम निर्माल्य संकलित करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदा माने तसेच नगरपरिषदेचे ओएस सचिन पाडे यांच्या हस्ते करण्यात आले. निर्माल्य संकलनाच्या या सेवाकार्यात प्रतिष्ठानच्या सांगोला, कडलास, आलेगाव, अजनाळे, खर्डी आणि भाळवणी येथील श्री बैठकीतील तब्बल २११ श्री सदस्यांनी सहभाग घेतला. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत श्री सदस्यांनी विविध ठिकाणी निर्माल्य संकलनाचे कार्य केले.
सांगोला शहर व परिसरातील १,१९७ घरगुती गणपती आणि ७ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनानंतर निर्माल्य संकलित करण्यात आले. धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधत हा उपक्रम पार पडला. गणेशोत्सव काळात भक्तिभावाने अर्पण करण्यात येणारे हार, फुले, दुर्वा, फळे आदी निर्माल्य पाण्यात विसर्जित केल्यास जलप्रदूषण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी संकलित केलेले निर्माल्य पाण्यात न टाकता त्याचा जैविक पद्धतीने पुनर्वापर करून कंपोस्ट खत निर्मितीसाठी वापरले जाते. या माध्यमातून निर्माल्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्याबरोबरच त्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीसाठी वापरले जाते. त्यामुळे धार्मिक परंपरेतून निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर करण्याचा आदर्श या उपक्रमातून समाजासमोर ठेवण्यात आला आहे. निर्माल्य कलश उपक्रम केवळ निर्माल्य संकलनापुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारा उपक्रम आहे. निर्माल्य जलस्रोतांमध्ये टाकल्यामुळे जलप्रदूषणासोबतच जलचरांनाही धोका निर्माण होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या माध्यमातून निर्माल्याचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक व्यवस्थापन केले जात आहे.‘स्वच्छता ही सेवा’ हा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. धार्मिक भावना जपत पर्यावरणाची काळजी घेता येते, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता अभियान, महाआरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, प्रौढ साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती, जलाशय स्वच्छता, विहीर पुनर्भरण, शालेय पुस्तकांचे वाटप, कुरण व्यवस्थापन यांसारखे विविध उपक्रम अविरतपणे सुरू आहेत. पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्त्व देत वृक्षलागवड, जलसंधारण आणि स्वच्छता यांसारख्या उपक्रमांमधून समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जात आहे. सांगोल्यासह पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज येथेही प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर निर्माल्य संकलनाचे कार्य करण्यात आले. धार्मिक उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता अशा संकलन उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. गणेशोत्सवातील श्रद्धा, सेवा आणि पर्यावरण संवर्धन यांचा त्रिवेणी संगम साधणारा ‘निर्माल्य कलश’ उपक्रम सांगोल्यात प्रभावीपणे राबविण्यात आला. ‘निर्माल्य पाण्यात नको, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हवे’ हा संदेश देत प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी केलेल्या सेवाकार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.


