गुन्हेगारी

सांगोल्यात दोन पत्रकारांवर प्राणघातक हल्ले; पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

एकावर लोखंडी रॉड, काठी, चैन, तलवार व कोयत्याने हल्ल्याचा आरोप; दुसऱ्याला पाईप-काठीने बेदम मारहाण

सांगोल्यात दोन पत्रकारांवर प्राणघातक हल्ले; पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

एकावर लोखंडी रॉड, काठी, चैन, तलवार व कोयत्याने हल्ल्याचा आरोप; दुसऱ्याला पाईप-काठीने बेदम मारहाण

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, दोन दिवसात दोन पत्रकारांवर स्वतंत्र ठिकाणी हल्ले झाल्याने पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सांगोला शहरातील रेल्वे पुलाखाली पत्रकार किशोर कृष्णा म्हमाने यांच्यावर दहा ते पंधरा जणांच्या जमावाने लोखंडी रॉड, लाकडी काठी, लोखंडी चैन, तलवार व कोयत्याने हल्ला केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. तर एखतपूर येथील खडी क्रशरजवळ पत्रकार बबन किसन चव्हाण रा. लोटेवाडी यांना तीन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकल अडवून लोखंडी पाईप व लाकडी काठीने मारहाण केल्याची तक्रार आहे. दोन्ही घटनांमध्ये पत्रकार जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांमुळे तालुक्यात पत्रकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

पहिल्या घटनेत पत्रकार किशोर म्हमाने हे ९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता दुचाकीवरून कडलास नाक्यावरून मिरज रोडच्या दिशेने जात होते. रेल्वे पुलाखाली आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाची दुचाकी आली. त्यावर संतोष सुखदेव लवटे याच्यासह दोन अनोळखी व्यक्ती असल्याचे म्हमाने यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. यावेळी ‘बंडू मासाळ यांना विरोधक का करतोस?’ असे म्हणत वाद सुरू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आणखी दहा ते पंधरा जण दुचाकींवरून घटनास्थळी आल्याचे म्हमाने यांनी सांगितले. तक्रारीनुसार, त्यानंतर संबंधितांनी लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. निखिल जानकर याने लोखंडी रॉडने डोक्यात, सागर मोटे याने लाकडी काठीने डोक्यावर, तर बबन जानकर याने लोखंडी चैनने पाठीवर मारल्याचा आरोप आहे.

विशाल जानकर याने तलवारीने मारण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र तलवार बाजूच्या भिंतीला लागल्याचे म्हमाने यांनी सांगितले. धनंजय पवार याच्याकडे लोखंडी कोयता असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याशिवाय धीरज काटे, अरमान शेख, दीपक वगैरे, कृष्णा व्हरे आणि अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीवेळी ‘याला आज जिवंत सोडायचे नाही, आज संपवून टाकायचे’ असे म्हणत धमकी देण्यात आल्याचा आरोप म्हमाने यांनी केला आहे.

दरम्यान, विष्णू देशमुख व अस्मीर तांबोळी हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी भांडण सोडविल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर हल्लेखोर दुचाकींवरून निघून गेल्याचे म्हमाने यांनी पोलिसांना सांगितले. या हल्ल्यात जखमी झालेल्या म्हमाने यांच्यावर सांगोला येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी सुभाष सुरवसे व बंडू मासाळ यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

एखतपूरजवळ दुसऱ्या पत्रकाराला पाईप-काठीने मारहाण

दुसरी घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास एखतपूर येथील खडी क्रशरजवळ घडली. पत्रकार बबन किसन चव्हाण हे दुचाकीवरून सांगोल्याहून लोटेवाडीच्या दिशेने जात होते. चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, पाठीमागून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर कोणतेही कारण न सांगता संबंधितांनी सोबत आणलेल्या लाकडी काठी व लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीत चव्हाण यांच्या डाव्या पायावर, दोन्ही हातांवर, डोक्यात तसेच उजव्या डोळ्यावर वार केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. ‘मला का मारता?’ अशी विचारणा करूनही हल्लेखोरांनी कोणतेही उत्तर दिले नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, मागून येणारे शंकर भगवान सरगर घटनास्थळी पोहोचताच तीनही अनोळखी व्यक्ती मोटारसायकलवरून सांगोल्याच्या दिशेने निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमी चव्हाण यांना प्रथम आटपाडी येथील देवकडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सांगोला येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सांगोला तालुक्यात एकाच दिवशी दोन पत्रकारांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाल्याने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, दोन्ही घटनांमागील नेमके कारण काय, हल्ल्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि हल्लेखोरांची पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तक्रारींमध्ये करण्यात आलेले आरोप तपासानंतरच स्पष्ट होणार असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!