गुन्हेगारी

अंत्यविधीस गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांची नजर; साडेचार लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

महूदमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

अंत्यविधीस गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांची नजर; साडेचार लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

महूदमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील महूद येथे घराला कुलूप लावून नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी सातारा येथे गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे महूद परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय शिवराम बाजारे (रा. महूद, ता. सांगोला) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते खडीक्रेशरचा व्यवसाय करतात. ६ जुलै रोजी त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून सातारा येथे अंत्यविधीसाठी गेले होते. दरम्यान, ८ जुलै रोजी सायंकाळी शेजाऱ्यांनी फोन करून घराचे कुलूप तुटले असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिली. त्यानंतर बाजारे कुटुंब तातडीने महूद येथे परतले असता घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.

घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या ऐवजात ८० हजार रुपये रोख, सुमारे चार तोळ्यांचा सोन्याचा राणीहार (किंमत २ लाख रुपये), अडीच तोळ्यांचे सोन्याचे नेकलेस (किंमत १ लाख ५० हजार रुपये) तसेच एक तोळ्याची सोन्याची अंगठी (किंमत ५० हजार रुपये) असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. महूदसह ग्रामीण भागात अलीकडील काळात घरफोडीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!