आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्यसेवेवर भर – सभापती चेतनसिंह केदार सावंत

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्यसेवेवर भर – सभापती चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (प्रतिनिधी) : आषाढी वारी सोहळ्यादरम्यान लाखो वारकऱ्यांना तातडीची, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज झाला आहे. वारी मार्गावरील आरोग्य सुविधांचे नियोजन, वैद्यकीय यंत्रणेची तयारी आणि आपत्कालीन सेवांचा सखोल आढावा घेण्यासाठी कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली.
भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वारी मार्गावरील आरोग्य सेवांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक टप्प्यावर सक्षम नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीत प्रत्येक पालखीसोबत ALS (Advanced Life Support) रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय पथकांची नियुक्ती, आपत्कालीन उपचार व्यवस्था, रुग्णवाहिका सेवा, चरण सेवा, मुख्यमंत्री वारकरी सुविधा उपचार केंद्र, मुख्यमंत्री वारकरी निवारा उपचार केंद्र, मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्यदूत, मेडिसिन किटचे वितरण, तसेच उष्माघात आणि संसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्वच्छतेवर विशेष भर देत सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून कार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, “आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाची अखंड परंपरा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नसून समाजसेवेचे कर्तव्य आहे. प्रत्येक वारकऱ्याला वेळेत, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज असून सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्कता, समन्वय आणि जबाबदारीने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीस आरोग्य समिती सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, शोभाताई खटकाळे, सविताताई कोकाटे, संगीताताई दुधाळ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज”वारकऱ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. वारी मार्गावरील प्रत्येक आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांना अखंड, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी स्पष्ट केले.



