वादळी वाऱ्याचा सांगोला तालुक्याला तडाखा; सहा गावांतील घरांचे पत्रे उडाले, मोठे नुकसान
सावे, चोपडी, सोनंद, नवी लोटेवाडी व किडेबिसरी येथे वादळी पावसाने कहर; सुदैवाने जीवितहानी टळली

वादळी वाऱ्याचा सांगोला तालुक्याला तडाखा; सहा गावांतील घरांचे पत्रे उडाले, मोठे नुकसान
सावे, चोपडी, सोनंद, नवी लोटेवाडी व किडेबिसरी येथे वादळी पावसाने कहर; सुदैवाने जीवितहानी टळली

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात शुक्रवारी (दि. ५ जून) सायंकाळी व रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक गावांना तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत सावे, चोपडी, सोनंद, नवी लोटेवाडी आणि किडेबिसरी येथील रहिवासी घरांचे पत्रे उडून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महसूल प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सावे येथील जावीर वस्तीवरील प्रभाकर तुकाराम जावीर यांच्या राहत्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. घराची पडझड होऊन आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच चोपडी येथील जयराम मळा परिसरात शिवाजी ज्ञानेश्वर बाबर यांच्या घराचे पत्रे उडून घराचे नुकसान झाले. सोनंद येथील स्टेशन रोड परिसरात धोंडीराम कांबळे यांच्या राहत्या घरालाही वादळी वाऱ्याचा फटका बसला असून घरावरील पत्रे उडून गेले आहेत. दरम्यान, नवी लोटेवाडी येथील मोरे वस्तीमध्ये उत्तम सुखदेव मोरे यांच्या राहत्या घराचे पत्रे उडून जाऊन मोठे नुकसान झाले आहे. किडेबिसरी येथेही वादळी वाऱ्याचा जोर अधिक असल्याने तानाजी तुकाराम रुपनर व धनाजी तुकाराम रुपनर यांच्या घरांचे पत्रे उडून गेले असून घरांचे नुकसान झाले आहे. तसेच महूद येथील येडगेवाडी परिसरातील गजेंद्र केशव नागणे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज पडली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सर्व घटना ५ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९.१५ वाजण्याच्या दरम्यान घडल्या. महसूल विभागाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



