तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत हनुमान विद्यामंदिर मरवडेचा डंका
१७ व १९ वर्षे वयोगटात दोन्ही संघांचा प्रथम क्रमांक

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत हनुमान विद्यामंदिर मरवडेचा डंका
१७ व १९ वर्षे वयोगटात दोन्ही संघांचा प्रथम क्रमांक
मरवडे (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यामंदिर, मरवडे येथे दिनांक २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत हनुमान विद्यामंदिर मरवडेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत दोन्ही वयोगटांत प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघानेही दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांनी आपल्या चपळाई, उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे दुहेरी यश संपादन केले. या विजयामुळे हनुमान विद्यामंदिर मरवडेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विजयी संघातील सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांचे मुख्याध्यापक शरद सौदागर व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
दिनांक 28 सप्टेंबर रोजी सर्व गटातील मुलांच्या स्पर्धांचे उद्घाटन माजी विद्यार्थी तथा राष्ट्रीय खोखो खेळाडू सम्राट घुले (जलसंपदा अधिकारी वर्ग 2) यांच्या शुभहस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रीय खो-खो खेळाडू सुहास आसबे कुस्तीपटू पै. दादासाहेब पवार, पै.दामोदर घुले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव पवार, रामभाऊ पाटील ,अशोक पवार, डॉ. माणिक पवार, स्कूल कमिटीचे सदस्य रोंगे सर, क्रीडा शिक्षक मनोहर शिंदे, बाळासाहेब भगरे सर, भारत घुले सर, मंगळवेढा तालुका क्रीडा समन्वयक अण्णासो वाकडे उपस्थित होते.
दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी सर्व गटातील मुलींचे सामने भरवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय खो खो खेळाडू दहा गोल्ड मेडलिस्ट, दोन सिल्वर मेडलिस्ट, बारा वेळा महाराष्ट्राच्या खो-खो संघाचे नेतृत्व केलेल्या मंडल अधिकारी प्राजक्ता सम्राट घुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत 19 वर्षे मुली गटात विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आणि 14 वर्षे वयोगटात विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. उद्घाटनाच्या कार्यक्रमास डॉ. कोमल गणपाटील, संग्राम दुधाळ सर, किरण लेंडवे, नगरसेवक प्रवीण गोवे, विजय दत्तू सर, , रोहित पोतदार, अथर्व हजारे, सुजित मेटकरी उपस्थित होते.
वरील सर्व विजयी विद्यार्थ्यांचे ॲड.नंदकुमार पवार, स्कूल कमिटीचे सदस्य संभाजीराव रोंगे, स्कूल कमिटीचे सदस्य बाळासाहेब भगरे, रयत सेवक साहेबराव पवार सर, अंबादास पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद सौदागर सर यांनी अभिनंदन केले. वरील सामने व्यवस्थित पार पाडण्यासाठी छत्रपती क्रीडा मंडळ मरवडेचे सुदर्शन घुले तसेच सर्व सदस्य, शिवप्रतिष्ठान खो-खो क्लब मंगळवेढा, नवभारत करिअर अकॅडमी विद्यालयाचे सर्व सेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



