महाराष्ट्र

सांगोल्यात गुटखा माफियांचा सुळसुळाट!, कारवाईसाठी नगरसेवक प्रशांत धनवजीरांचा उपोषणाचा इशारा

तरुणाईचा जीव धोक्यात, गुटखा माफिया मोकाट.. १ मेपासून उपोषण

सांगोल्यात गुटखा माफियांचा सुळसुळाट!, कारवाईसाठी नगरसेवक प्रशांत धनवजीरांचा उपोषणाचा इशारा

तरुणाईचा जीव धोक्यात, गुटखा माफिया मोकाट.. १ मेपासून उपोषण

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरासह ग्रामीण भागात गुटखा माफियांचा बेकायदेशीर व्यापार दिवसेंदिवस बळावत चालला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा धंदा अक्षरशः ‘राजरोस’ सुरू असल्याचा संतापजनक आरोप नगरसेवक प्रशांत धनवजीर यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणी तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास १ मे ‘कामगार दिना’पासून उपोषणाला बसण्याचा थेट इशारा त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिला आहे.

सांगोला नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक धनवजीर यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध सुरक्षा अधिकारी, सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगोला शहर व तालुक्यात काही गुटखा माफियांकडून मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी करून त्याची खुलेआम विक्री केली जात आहे. फेरीवाल्यांच्या माध्यमातून गुटखा घराघरात पोहोचवला जात असून यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत आहे. या अवैध व्यापारामुळे अनेक तरुणांना कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला असून अल्पवयीन मुलांनाही या व्यसनाची सवय लागल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. “ही केवळ कायद्याची नाही तर समाजाच्या आरोग्याची लढाई आहे,” असे नगरसेवक प्रशांत धनवजीर यांनी स्पष्ट केले.

सदर गुटखा माफियांवर यापूर्वीही गुन्हे दाखल असूनही ते जामिनावर सुटताच पुन्हा त्याच धंद्यात सक्रिय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही अधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादा’मुळेच हा काळाबाजार पुन्हा जोमाने सुरू होत असल्याचा गंभीर संशयही व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीही प्रशासनाला लेखी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता संतप्त भूमिका घेत धनवजीर यांनी १ मेपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती सोलापूर, सांगली, पुणे येथील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह अन्न व औषध सुरक्षा मंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. सांगोल्यातील वाढत्या गुटखा व्यापारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!