GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार
पान मसाला, गुटखा, दारू इत्यादी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागणार

GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार
पान मसाला, गुटखा, दारू इत्यादी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) जीएसटीमधील १२ आणि २८ टक्क्यांचा स्लॅब संपविण्यात आला असून आता सर्व वस्तू या ५ टक्के आणि १८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. या नव्या जीएसटी रचनेची आज घोषणा करण्यात आली असून येत्या २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी रचना लागू होणार आहे. आलिशान गाड्या, साखरेचे पेये, फास्ट फूड महागणार आहेत. काही वस्तूंवरील कर हा १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तसेच लक्झरी वस्तूंसाठी ४० टक्के कर लागणार आहे. पान मसाला, गुटखा, दारू इत्यादी वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागणार आहे. वैयक्तिक विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे विमा खरेदी आता स्वस्त झाली आहे.
जीएसटी परिषदेची ५६ वी बैठक बुधवारी दिल्लीत झाली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीचे आता फक्त दोन स्लॅब असतील. ५ टक्के जीएसटी आणि १८ टक्के जीएसटी. १२ आणि २८ टक्के जीएसटीचा स्लॅब सरकारने संपुष्टात आणला आहे. चारऐवजी दोन टॅक्स स्लॅब आल्याने आता अनेक वस्तू स्वस्त होण्याची चिन्हं आहेत. मात्र चैनीच्या आणि हानीकारक असलेल्या वस्तुंसाठी निराळा टॅक्स स्लॅब आणला गेला आहे जो ४० टक्के इतका आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत घोषणा केली.
सिमेंटवरील जीएसटी देखील २८% वरून १८% पर्यंत कमी झाला आहे, यामुळे लोकांचे घरांचे स्वप्न स्वस्त झाले आहे. अनेक औषधांवरील जीएसटी शून्यावर आणण्यात आला आहे. छोट्या कार आणि मोटारसायकली (३५० सीसी), टीव्ही आदी गोष्टी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणण्यात आल्या आहेत. पिझ्झा, ब्रेड, दूध आणि चीजवर जीएसटी लागणार नाही. शाम्पू, साबण, तेल आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या इतर घरगुती वस्तूंव्यतिरिक्त, नमकीन, पास्ता, कॉफी, नूडल्सवर आता 5 टक्के GST आकारण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.