सामाजिक

सांगोल्यात दरवळतोय गुटख्याचा सुगंध…गुटखा माफियांचा सुळसुळाट

शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक प्रशांत धनवजीर आक्रमक, कारवाई न झाल्यास कार्यकर्त्यांसह उपोषणाचा इशारा

सांगोल्यात दरवळतोय गुटख्याचा सुगंध…गुटखा माफियांचा सुळसुळाट

शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक प्रशांत धनवजीर आक्रमक, कारवाई न झाल्यास कार्यकर्त्यांसह उपोषणाचा इशारा

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहर व तालुक्यात राजरोसपणे गुटख्याची वाहतूक व विक्री होत असून तालुक्यात गुटख्याचा सुगंध दरवळत असल्याचे दिसून येत आहे. सांगोला शहर व ग्रामीण भागात गुटखा माफियांचा बेकायदेशीर व्यापार पुन्हा तेजीत सुरू असल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक व शिवसेनेचे गटनेते प्रशांत धनवजीर यांनी अन्न व औषध सुरक्षा विभागाकडे केली आहे. कारवाई टाळली गेल्यास कार्यकर्त्यांसह कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. गुटखाबंदीच्या निर्णयाने खरोखरच गुटखा बंद झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेजारच्या राज्यातून गुटखा आणून सांगोल्यात चढ्या भावाने विक्री होत असल्यामुळे हा काळाबाजार फोफावला आहे.

सांगोला शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री व साठा सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विविध ठिकाणांहून गुटखा आणून त्याची खुलेआम विक्री होत असल्यामुळे परिसरातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत. यामुळे आरोग्य व सामाजिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. नगरसेवक प्रशांत धनवजीर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगोला परिसरात गुटखा विक्रेत्यांचे जाळे सक्रिय झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी हा बेकायदेशीर व्यापार सुरू आहे. त्यामुळे स्थानिक तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. मात्र काही अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे संबंधितांनी पुन्हा नव्याने गुटखा विक्री सुरू केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या संदर्भात अन्न व औषध सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त, विभागीय अधिकारी तसेच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे. जर संबंधित गुटखा विक्रेत्यांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर आपल्या कार्यकर्त्यांसह अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक प्रशांत धनवजीर यांनी दिला आहे. त्यामुळे आता अन्न व औषध सुरक्षा प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे सांगोला तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!