गुन्हेगारी

गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; मात्र पुरवठादार मोकाट!

किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हे, लाखोंचा माल पुरविणारे ‘पुरवठादार’ रडारबाहेरच? सांगोल्यात प्रतिबंधित विमल पानमसाल्याचा तब्बल २.९० लाखांचा साठा जप्त!

गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका; मात्र पुरवठादार मोकाट!

किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हे, लाखोंचा माल पुरविणारे ‘पुरवठादार’ रडारबाहेरच?

सांगोल्यात प्रतिबंधित विमल पानमसाल्याचा तब्बल २.९० लाखांचा साठा जप्त!

गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होत असली, तरी या प्रतिबंधित मालाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या मुख्य पुरवठादारांवर कारवाई कधी होणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाते; मात्र त्यांच्यापर्यंत माल पोहोचविणाऱ्या साखळीतील प्रमुख व्यक्ती मोकाट फिरत असल्याने कारवाईच्या प्रभावीतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘विक्रेता पकडला, पण पुरवठादार का नाही?’ असा सवाल आता चर्चेत आला असून, प्रतिबंधित गुटख्याच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेऊन मुख्य सूत्रधारांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सांगोला तालुक्यात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक आणि साठवणुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कटफळ रोडवरील कासळगंगा ओढ्याजवळ १० ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ९० हजार ४०० रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी गणेश महादेव कदम यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश सुरेश महाडिक (वय ३९, रा. आनंद नगर, श्रीपूर, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी गणेश महादेव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश सुरेश महाडिक हा व्यक्ती प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवत असल्याचे आढळून आले. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विमल पानमसाल्याचे १,३२० पुडे, प्रत्येकी १९८ रुपये किमतीचे, असा एकूण २ लाख ६१ हजार ३६० रुपयांचा साठा आढळून आला. तसेच व्ही-१ तंबाखूचे २२ पुडे, प्रत्येकी २२ रुपये किमतीचे, असा २९ हजार ४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. दोन्ही मिळून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ९० हजार ४०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, सोलापूर येथे जमा करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित करण्यात आलेल्या पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक याबाबत प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. या प्रकरणात केवळ जप्त मालाचा साठा करणाऱ्या व्यक्तीपुरताच तपास मर्यादित न ठेवता, प्रतिबंधित पदार्थांचा मूळ मालक कोण?, पुरवठादार कोण? याचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या आदेशान्वये पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत वाघे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाई केली जात असली, तरी या कारवाईत केवळ किरकोळ विक्रेतेच लक्ष्य होत असल्याचे चित्र दिसत आहे. विक्रेत्यांकडून गुटखा जप्त करून गुन्हे दाखल केले जात असताना, हा माल नेमका कुठून येतो, कोण पुरवठा करतो आणि या अवैध व्यवसायामागे असलेली मोठी साखळी कोण चालवते, याचा छडा लावून मुख्य पुरवठादारांवरही कठोर कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

गुटख्याची विक्री करणाऱ्या एखाद्या दुकानावर कारवाई झाली की काही प्रमाणात प्रतिबंधित माल जप्त केला जातो. मात्र, जप्तीचा माल विक्रेत्यापर्यंत पोहोचतो कुठून? हा मूलभूत प्रश्न अद्याप अनुत्तरित राहत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. ‘गुटखा विकणारा पकडला जातो; पण गुटखा पुरवणारा कोण?’ हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे आगामी काळात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून प्रतिबंधित गुटख्याच्या मूळ पुरवठादारांवर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!