सांगोल्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! १५ हजारांत गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा
गोपनीय माहितीवर आरोग्य विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई; सोनोग्राफी मशीन, मोबाईल व साहित्य जप्त

सांगोल्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! १५ हजारांत गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा
गोपनीय माहितीवर आरोग्य विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई; सोनोग्राफी मशीन, मोबाईल व साहित्य जप्त
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात गर्भलिंग निदानासारख्या सामाजिकदृष्ट्या गंभीर आणि कायद्याने प्रतिबंधित गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सांगोला पोलिस व वैद्यकीय प्रशासनाच्या संयुक्त पथकाने बुधवार ५ ऑगस्ट रोजी वाकी-शिवणे (ता. सांगोला) येथे धाडसी कारवाई करत प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधित असताना बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एका संशयिताला रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत आधुनिक सोनोग्राफी मशीन, स्मार्ट मोबाईल तसेच संबंधित साहित्य जप्त करून सील करण्यात आले. या प्रकरणाचे धागेदोरे बारामतीपर्यंत पोहोचत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भास्कर रामचंद्र घाडगे (रा. वाकी शिवणे, ता. सांगोला), प्रवीण पोपट देशमुख (रा. बारामती) आणि एजंट बापूराव किसवे गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार शिवाजी पांढरे यांना वाकी-शिवणे येथील एका घरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत वाघे तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. सरकारी पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता मंगळवेढा तालुक्यातील एक पती-पत्नी आधुनिक सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने गर्भलिंग निदान करून घेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पथकाने घटनास्थळावरील आधुनिक सोनोग्राफी मशीन, एक स्मार्ट मोबाईल आणि इतर संबंधित साहित्य जप्त करून सील केले.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत घरात सुरू असलेले बेकायदेशीर गर्भलिंग निदान उघडकीस आणले. दरम्यान, कारवाईदरम्यान एका गर्भवती महिलेची चौकशी करण्यात आली. तिच्या पतीने भास्कर घाडगे यांच्याकडे १५ हजार देऊन गर्भात मुलगा आहे की मुलगी, हे जाणून घेण्यासाठी आणल्याचे सांगितले. यानंतर पथकाने घराची झडती घेतली असता गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी उपकरण, मोबाईल, चार्जर आदी साहित्य जप्त करून पंचनामा केला.
पोलिसांच्या चौकशीत भास्कर घाडगे यांनी मार्च २०२६ पासून एजंट बापूराव किसवे यांच्या माध्यमातून बारामती येथील प्रवीण पोपट देशमुख यांच्याकडे रुग्ण पाठविले जात असल्याची माहिती दिली. सुमारे २० दिवसांपूर्वी संबंधित सोनोग्राफी मशीन प्रवीण देशमुख यांनी दिल्याचेही त्यांनी कबूल केल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. त्यानंतर रुग्णांना घरी बोलावून गर्भातील लिंगाची माहिती दिली जात असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणात भास्कर रामचंद्र घाडगे (रा. वाकी शिवणे, ता. सांगोला), प्रवीण पोपट देशमुख (रा. बारामती) आणि एजंट बापूराव किसवे यांनी संगनमत करून गर्भवती महिलांची बेकायदेशीर सोनोग्राफी करून गर्भाचे लिंग निदान करीत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सांगोला पोलिस करीत आहेत.



