मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू
मानेगावातील घटना : सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर; १२ तासांत माय-लेकरावर अंत्यसंस्कार

मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू
मानेगावातील घटना : सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर; १२ तासांत माय-लेकरावर अंत्यसंस्कार
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला. पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ४२ वर्षीय असलम अब्दुल सय्यद यांचे निधन झाले. मुलाच्या अकाली जाण्याचा जबर मानसिक धक्का सहन न झाल्याने अवघ्या काही तासांत त्यांच्या ६७ वर्षीय आईचेही निधन झाले. त्यामुळे अवघ्या १२ तासांच्या अंतरात माय-लेकरावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर ओढावली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे असलम सय्यद यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या धक्क्याने मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच जन्मदात्या वृद्ध आईचाही हृदयविकाराच्या धक्क्यानेच मृत्यू झाल्याने मानेगावात ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना रविवार २८ जून रोजी मानेगाव ता. सांगोला येथे घडली.
अस्लम अब्दुल सय्यद (वय. ४२) व अप्रुफा अब्दुल सय्यद (वय. ६७, रा. मानेगाव, ता. सांगोला) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. मृत दोघांवर सोनंद येथील कब्रस्तान या ठिकाणी दफनविधी करण्यात आला. मयत अस्लम सय्यद हा मानेगावात शेती व्यवसायाबरोबरच चिकन मटन विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता, त्यातच दोन वर्षापूर्वी त्याच्या भावाचा मृत्यू झाल्याने सय्यद कुटुंब अद्यापही सावरले नव्हते. घरातील कर्ता मुलगा अस्लमच्या अकस्मात मृत्यूचा त्याची आई अप्रुफा यांना मानसिक धक्का बसला होता. दिवसभर माझा अस्लम.. माझा अस्लम म्हणून त्या टाहो फोडत होत्या त्याचदिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक अप्रुफा यांनाही घरातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी सय्यद कुटुंबातील दोन व्यक्तींचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



