भरधाव कंटेनरची दुचाकीला समोरून धडक; पती-पत्नीसह गर्भातील सात महिन्यांच्या बाळाचाही अंत
एकाच चितेवर अंत्यसंस्कार; वाकी शिवणे गाव शोकसागरात, सांगोला तालुक्यात हळहळ

भरधाव कंटेनरची दुचाकीला समोरून धडक; पती-पत्नीसह गर्भातील सात महिन्यांच्या बाळाचाही अंत
एकाच चितेवर अंत्यसंस्कार; वाकी शिवणे गाव शोकसागरात, सांगोला तालुक्यात हळहळ
सांगोला (प्रतिनिधी): नव्या बाळाच्या आगमनाची स्वप्ने उराशी बाळगून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला वैद्यकीय तपासणीसाठी दुचाकीवरून सांगोल्याकडे घेऊन निघालेल्या पतीवर नियतीने काळाचा घाला घातला. भरधाव कंटेनरने समोरून दिलेल्या भीषण धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर आईच्या गर्भात वाढणाऱ्या सात महिन्यांच्या निष्पाप बाळाचाही जन्मापूर्वीच दुर्दैवी अंत झाला. या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर मृत दाम्पत्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हा भीषण अपघात शनिवारी (दि. २७) दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास सांगोला–जत महामार्गावरील कडलास येथील गायकवाड वस्ती परिसरात घडला.या दुर्घटनेत सागर भारत जाधव (वय २७) व सुजाता सागर जाधव (वय २४, रा. वाकी शिवणे, ता. सांगोला) या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. सुजाता या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यामुळे त्यांच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला. एका क्षणात तीन जीव काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सागर जाधव हे सोनंद येथे जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यांनी सुजाता यांच्याशी विवाह केला होता. संसाराला काही वर्षे झाली होती आणि आता त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने दोघेही आनंदात होते. सुजाता सात महिन्यांच्या गर्भवती असल्याने नियमित तपासणीसाठी शनिवारी दुपारी दोघेही दुचाकीवरून सोनंद येथून कडलासमार्गे सांगोल्याकडे निघाले होते.
परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. त्याचवेळी सांगोल्याकडून जतच्या दिशेने अवजड साहित्य घेऊन जाणारा कंटेनर भरधाव वेगाने येत होता. कडलासजवळील गायकवाड वस्ती परिसरात कंटेनरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की सागर व सुजाता हे रस्त्यावर फेकले गेले. दोघांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. सुजाता यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सागर यांचाही घटनास्थळीच प्राण गेला. अपघाताच्या वेळी सुजाता या सात महिन्यांच्या गर्भवती असल्याने त्यांच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला.
अपघातानंतर दोघांचे मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा वाकी शिवणे येथील जाधव मळ्यात पती-पत्नीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकत्र संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या दाम्पत्याला मृत्यूनंतरही एकाच चितेवर निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक स्वतःहून सांगोला पोलीस ठाण्यात हजर झाला. सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार बाबासाहेब भातुगडे करीत आहेत.



