डॉक्टर्स डे निमित्त सांगोला येथे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
सांगोला डॉक्टर्स असोसिएशन व सूर्योदय परिवाराचा स्तुत्य उपक्रम

डॉक्टर्स डे निमित्त सांगोला येथे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
सांगोला डॉक्टर्स असोसिएशन व सूर्योदय परिवाराचा स्तुत्य उपक्रम
सांगोला (प्रतिनिधी): माणसाची सहनशक्ती आणि कणखरपणा वाढवणारा, अमूल्य अशा वेळेचे भान राखत वक्तशीरपणा आणि सातत्य शिकवणारा आणि चिंता व तणाव मुक्त होऊन अंगी स्वयंशिस्त निर्माण करणारा जागतिक कीर्तीचा लोकप्रिय क्रीडा प्रकार म्हणून गौरवलेल्या मॅरेथॉन प्रकारच्या भव्य सांगोला मॅरेथॉन 2026 चे आयोजन येत्या एक जुलै रोजी सांगोला येथे करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू व क्रीडा रसिकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अंकित गर्ग यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी राहणार आहे.
समर्पण, विश्वास, सेवा आणि एकता ही चतुसूत्री मनामध्ये बाळगून व धन्वंतरी देवतेचे सतत स्मरण ठेवत विविध प्रकारच्या रुग्णांच्या जीवनात चैतन्य निर्माण करत पवित्र वैद्यकीय पेशा जपणारी सांगोला डॉक्टर्स असोसिएशन आणि हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देत असंख्य कुटुंबांसाठी आधारवड होऊन सहकार, उद्योग, चळवळ व सामाजिक बांधिलकी व्यापक स्वरूपात जपत समाजातील प्रत्येक घटकांसाठी सातत्याने कार्य करत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला सूर्योदय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी सहप्रायोजक असलेले रेवनील ब्लड बँक सांगोला, माडगूळकर ज्वेलर्सआणि सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांचेही मोलाचे सहकार्य आहे. यामध्ये दहा किलोमीटर खुला गट, पाच किलोमीटर पुरुष गट आणि पाच किलोमीटर महिला गट अशा त्रिस्तरीय मॅरेथॉन शर्यती संपन्न होणार असून प्रत्येक गटातून पहिली तीन बक्षिसे पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
दहा किलोमीटर खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेसाठी पहिले बक्षीस एकवीस हजार रुपयांचे असून डॉ.निकिता बाबासाहेब देशमुख यांच्या अमूल्या फिटल मेडिसिन सेंटर पंढरपूर यांचे कडून देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंधरा हजार रुपयांचे असून डॉ. संतोष पिसे यांच्या पिसे डायग्नोस्टिक सेंटर सांगोला यांचे कडून देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रुपयांचे असून डॉ अमरसिंह शेंडे यांच्या आनंद हॉस्पिटल सांगोला कडून देण्यात येणार आहे. पाच किलोमीटर पुरुष गटातील मॅरेथॉन स्पर्धेचे पहिले बक्षीस दहा हजार रुपयांचे असून डॉ.विजय बंडगर यांच्या यशोदा हॉस्पिटल यांचे कडून देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस साडेसात हजार रुपयांचे असून पंचायत समिती सदस्य डॉ.आबासाहेब दबडे यांचे कडून देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपयांचे असून कै.योगिनी सोनलकर यांचे स्मरणार्थ अमृतयोग हॉस्पिटल यांचे करून देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर पाच किलोमीटर महिला गटातील मॅरेथॉन स्पर्धेचे पहिले बक्षीस दहा हजार रुपयांचे असून डॉ.धनंजय गावडे यांच्या सद्गुरु हॉस्पिटल व ट्रॉमा केअर सेंटर यांचे कडून देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस साडेसात हजार रुपयांचे असून डॉ.राहुल माने यांच्या अक्सिस डायग्नोस्टिक सेंटर यांच्याकडून देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपयांचे असून डॉ. अजय कोरे यांच्या कोरे मेडिकलच्या वतीने देण्यात येणार आहे.
सांगोला मॅरेथॉन 2026 स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता जयनिला, चंद्रभागा नेत्रालय, आधार क्लिनिक, हॉटेल श्रीराम, ॲक्सिस डायग्नोस्टिक सेंटर, आनंद लॉन्स, समृद्धी सक्सेस, श्रीराम नवमी यात्रा समिती वासूद, मोरया स्टील अँड फर्निचर, संभाजी ब्रिगेड, सांगोला एम.आर.आय.अँड सिटीस्कॅन सेंटर, महेश फ्रुट कंपनी, श्री विठ्ठल स्टील ट्रेडर्स, हॉटेल जाधव आणि संगम फॅमिली रेस्टॉरंट इत्यादींनी देखील मोलाचे योगदान दिलेले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेकरिता आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी सांगोला यांचे वतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यामधून देखील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये व दोन हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. थोर स्वातंत्र सेनानी आणि पेशाने डॉक्टर असलेले पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बी.सी. रॉय यांची जयंती व पुण्यतिथी असलेला एक जुलै हा दिवस समस्त डॉक्टरांच्या अतुलनीय सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून भारत सरकारकडून 1991 पासून राष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’ घोषित करण्यात आला. या दिवशी सर्वत्र विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येतो.
सांगोला डॉक्टर्स असोशियनने आरोग्यासाठी उपयुक्त अशा मॅरेथॉन सारख्या स्पर्धेचे आयोजन करून एक वेगळा आदर्श समाजासमोर उभा केलेला आहे. दरवर्षी या दिवशी प्रत्येक डॉक्टरांच्या दालनात जाऊन त्यांच्या सेवेचा सन्मान करण्याची सूर्योदय परिवाराची अनेक वर्षांची परंपरा असून क्रिकेट रसिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सूर्योदय चषकच्या’ यशस्वी स्पर्धेनंतर ‘डॉक्टर्स डे’ निमित्त सांगोला मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनात सूर्योदय परिवाराने हिरीरीने घेतलेला सहभाग देखील कौतुकास्पद आहे. या मॅरेथॉन स्पर्धा बुधवार एक जुलै रोजी सकाळी सहा वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मैदान ते माणनदी या दरम्यान संपन्न होणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी अवघी 300 रुपये इतकी नाममात्र रजिस्ट्रेशन फी असून यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा. तसेच सांगोला शहर व परिसरातील क्रीडा रसिकांनी ‘डॉक्टर्स डे’ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



