गुन्हेगारी

राजुरीच्या ग्रामदैवत लक्ष्मीदेवी मंदिरात चोरी; चांदीचा मुखवटा आणि दागिने लंपास

सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद; २ लाख ४१ हजारांच्या ऐवजावर डल्ला, परिसरात खळबळ

राजुरीच्या ग्रामदैवत लक्ष्मीदेवी मंदिरात चोरी; चांदीचा मुखवटा आणि दागिने लंपास

सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद; २ लाख ४१ हजारांच्या ऐवजावर डल्ला, परिसरात खळबळ

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील राजुरी येथील ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल २ लाख ४१ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील मौल्यवान दागिने आणि सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा चोरट्यांनी लंपास केल्याने राजुरी परिसरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी मंदिराचे पुजारी रमेश भगवान गुरव (वय ५२, रा. राजुरी) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मंदिराचे पुजारी रमेश भगवान गुरव नेहमीप्रमाणे देवीची पुजाआर्चा करून आठच्या सुमारास मंदिर बंद करून घरी गेले होते. २० जून रोजी पहाटे पाचच्या सुमारास नेहमी प्रमाणे लक्ष्मीदेवीचे मंदिराची झाडलोट पुजा अर्चा करणेसाठी मंदिराचे पुजारी रमेश भगवान गुरव गेले असता मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी देवीच्या गाभाऱ्यात जावुन पाहीले असता देवीच्या दगडी मुर्तीला असलेला चांदीचा मुखवटा दिसुन आला नाही. तसेच अधिक पाहणी केली असता देवीच्या अंगावरील मणीमंगळसुत्र दिसुन आले नाही. त्यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील विजय तानाजी वाघमारे, यांना फोनद्वारे कळवुन बोलावुन घेतले. त्यानंतर त्यांनी घडले घटनेबाबत पोलीसांना सांगून गावातील यात्रा कमिटीचे अध्यक्ष अध्यक्ष दिलीप पांडुरंग दबडे, तसेच सदस्य दादासाहेब सहदेव निळे, बाळु सिताराम बिसले, दत्तात्रय बाबु दबडे असे गावातील लोकांना बोलावुन घेऊन घडला प्रकार सांगितले.

१९ जून रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते २० जून रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता तीन अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर देवीच्या मूर्तीवरील अंदाजे एक किलो वजनाचा, सोन्याचा मुलामा दिलेला आणि सोन्याचे डोळे बसविलेला सुमारे २ लाख १५ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा चोरून नेला. याशिवाय सुमारे २२ हजार रुपये किमतीचे काळ्या मण्यांत ओवलेले सोन्याचे मंगळसूत्र तसेच ४ हजार रुपये किमतीचा पितळी पंचधातूचा घोडाही चोरट्यांनी लंपास केला. एकूण चोरीस गेलेल्या मालाची किंमत २ लाख ४१ हजार रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित चोरटे दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. ग्रामदैवताच्या मंदिरातच चोरी झाल्यामुळे राजुरी गावात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून चोरट्यांना तातडीने अटक करून चोरीस गेलेला ऐवज परत मिळवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!