आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; ५ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाखांचा निधी मंजूर

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; ५ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाखांचा निधी मंजूर
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, गौडवाडी, बुद्धेहाळ, राजुरी, नाझरे आणि नराळे या पाच ग्रामपंचायतींना नवीन इमारतींसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना अंतर्गत मंजूर झाला असून, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
ग्रामपंचायतींच्या इमारती अपुऱ्या व असुविधाजनक असल्याने प्रशासन चालवताना पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नवीन, सुसज्ज आणि स्वतंत्र कार्यालयीन इमारती उभारण्याची मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शासनाकडे सातत्याने लावून धरली होती. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे अधिवेशनापूर्वीच या संदर्भात मागणी करण्यात आली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत संबंधित पाच ग्रामपंचायतींसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, नागरिकांना अधिक जलद व प्रभावी सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक पातळीवर विकासकामांना गती मिळण्यासही या निर्णयामुळे मोठी मदत होणार आहे. निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.
ग्रामपंचायतींना सुसज्ज इमारती मिळाल्यास शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवता येतात. नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळाव्यात, तसेच प्रशासन कार्यक्षम व्हावे, या उद्देशाने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला आहे.
.



