जनावरांना निर्दयीपणे डांबून वाहतूक; सांगोला पोलिसांची धडक कारवाई
पिकअपमधून ६ गोवंशीय जनावरे ताब्यात; ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
जनावरांना निर्दयीपणे डांबून वाहतूक; सांगोला पोलिसांची धडक कारवाई
पिकअपमधून ६ गोवंशीय जनावरे ताब्यात; ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील सोनंद हद्दीतील लक्ष्मीनगर शिवारात गोवंशीय जनावरांची अमानुष व निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर सांगोला पोलिसांनी कारवाई केली. महिंद्रा बोलेरो पिकअपमधून क्षमतेपेक्षा अधिक दाटीवाटीने ५ बैल व १ खोंड अशी एकूण सहा जनावरे वाहतूक करताना आढळून आली. या कारवाईत जनावरे व वाहतूक करणारे वाहन असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हणमंत फकीराप्पा नंदी (रा. उपारती, ता. गोकाक, जि. बेळगाव) आणि दऱ्याप्पा लक्ष्मण वडचानवर (रा. तिगडी, ता. गोकाक, जि. बेळगाव) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता घेरडी दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी सरकारी वाहनातून पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सोनंद येथील प्रमोद काशिद यांनी पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली की, सांगोला-जत मार्गावरील सोनंद हद्दीतील लक्ष्मीनगर शिवारात एका पिकअप वाहनामध्ये गोवंशीय जनावरे दाटीवाटीने भरून त्यांची चारा-पाण्याची व्यवस्था न करता अमानुषपणे वाहतूक केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता पिकअपच्या मागील हौद्यात पांढऱ्या रंगाचे खिलार जातीचे पाच बैल आणि एक खोंड, अशी एकूण सहा जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबलेली आढळून आली. जनावरांना हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने लोखंडी अँगलला दोरीने बांधण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांच्या तपासणीत वाहनामध्ये जनावरांना आवश्यक असलेली चारा, पाणी व औषधांची व्यवस्था नसल्याचे समोर आले. तसेच जनावरांच्या वाहतुकीबाबत आवश्यक असलेला बोर्ड वाहनावर लावलेला नव्हता. आरटीओची आवश्यक परवानगी तसेच अधिकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्रही नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणी वाहनचालक हणमंत फकीराप्पा नंदी (वय २४, रा. उपारती, ता. गोकाक, जि. बेळगाव) आणि त्याच्यासोबत असलेला दऱ्याप्पा लक्ष्मण वडचानवर (वय २८, रा. तिगडी, ता. गोकाक, जि. बेळगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा जनावरे व महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यामध्ये सहा जनावरांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये, तर महिंद्रा बोलेरो पिकअपची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.सदर कारवाईनंतर जनावरे व वाहन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र साबळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० चे कलम ११(१), ११(१)(अ), ११(१)(फ), ११(१)(ह), ११(१)(आय), प्राण्यांचे परिवहन नियम, १९७८ मधील कलम ४७, ५४, ५६ तसेच बीएनएस कलम ३(५) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध व नियमबाह्य पद्धतीने जनावरांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या वाहतुकीवर पोलिसांनी अधिक कडक नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.



