सांगोल्यात महसूलच्या भरारी पथकावर वाळू माफियांचा हल्ला
मंडळ अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक, महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

सांगोल्यात महसूलच्या भरारी पथकावर वाळू माफियांचा हल्ला
मंडळ अधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक, महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
सांगोला (प्रतिनिधी): अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेत सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून एका महसूल कर्मचाऱ्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जोपर्यंत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी राहणार असल्याचे निवेदन महसूल कर्मचारी संघटनेने तहसीलदार बाळुताई भागवत यांना दिले आहे. सांगोला तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे समोर येत आहे. या अवैध व्यवसायातून हातात सहज पैसा येत असल्याने परिसरात दादागिरीचे प्रकार वाढल्याची चर्चा आहे.
याबाबत मंडळ अधिकारी महेश गणपत जाधव (वय 38, रा. शिवाजीनगर, सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अतुल गावडे, पप्पू बिचूकले रा. दोघे जवळा ता सांगोला व टिपर वाहनावरील अज्ञात चालक (नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडळ अधिकारी महेश गणपत जाधव (वय 38, रा. शिवाजीनगर, सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तहसीलदार, सांगोला यांच्या आदेशानुसार तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. दि. 3 मार्च रोजी मध्यरात्री जवळा येथील आगलावे वस्ती येथे कोरडा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर मंडळ अधिकारी महेश जाधव यांच्यासह गौरव कुंभार (ग्राम महसूल अधिकारी), समाधान सूर्यगंध (महसूल सेवक वाढेगाव), सुनील गोडसे (महसूल सेवक, मेडशिंगी), दिलीप काळे (वाहन चालक), सरकारी वाहन क्र.एम.एच. 45 ए.एल 8171 व खाजगी वाहन क्र.एम.एच. 45 ए.यु. 6731 त्यावरील चालक रणजीत देशमुख रा. सांगोला असे भरारी पथक तयार करून दोन्ही वाहनातून जवळा येथे रवाना झाले.
पहाटे सुमारे 3.05 वाजण्याच्या सुमारास कडलास-जवळा मार्गावर संशयित टिपर आढळला. महसूल विभागाच्या पथकाने वाहन थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने काही अंतरावर वाहन उभे करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. तपासणीअंती वाहनात अंदाजे 3 ब्रास अवैध वाळू आढळून आली. शासनाची कोणतीही रॉयल्टी किंवा परवानगी नसल्याने टिपर ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेतलेला टिपर तहसील कार्यालयात आणत असताना कडलास येथे पहाटे 3.40 वाजता विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा कारने सरकारी वाहन अडवले. स्वतःला टिपर मालक असल्याचे सांगत अतुल गावडे व त्याचा साथीदार पप्पू बिचुकले (दोघे रा. जवळा, ता. सांगोला) यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत “तुम्हाला जिवंत सोडत नाही” अशी धमकी दिली. यावेळी वाळू माफ यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच दगडफेक करून सरकारी वाहन (एमएच 45 एएल 8171) व खाजगी वाहन (एमएच 45 एयू 6731) यांच्या समोरील काचा फोडल्या. या दगडफेकीत महसूल सेवक सुनील गोडसे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे नख तुटून ते जखमी झाले.
घटनेनंतर महसूल विभागाच्या भरारी पथकाने सांगोला पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. पोलिस येईपर्यंत आरोपी क्रेटा वाहनातून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व जखमींना वैद्यकीय उपचारासाठी पाठवले. याबाबत मंडळ अधिकारी महेश गणपत जाधव (वय 38, रा. शिवाजीनगर, सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अतुल गावडे, पप्पू बिचूकले रा. दोघे जवळा ता सांगोला व टिपर वाहनावरील अज्ञात चालक (नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



