बुद्धेहाळ तलाव परिसरात दुर्मिळ ब्लू-चीक्ड बी-ईटरचे थवे
प्रवासी मार्गावरचे पक्षी म्हणून सांगोला तालुक्यातील पहिली नोंद

बुद्धेहाळ तलाव परिसरात दुर्मिळ ब्लू-चीक्ड बी-ईटरचे थवे
प्रवासी मार्गावरचे पक्षी म्हणून सांगोला तालुक्यातील पहिली नोंद
सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव व परिसर हा शांत, निसर्गरम्य, पक्षी व वन्यजीवांसाठी माहेरघर म्हणून ओळखला जातो. या तलावावर ब्लू-चीक्ड बी-ईटर म्हणजेच निळ्या गालाचा वेढा राघु/ निळ्या गालाचा पाणपोपट या दुर्मिळ प्रवासी मार्गावरील पक्ष्यांच्या पन्नास हून अधिक मोठ्या थव्याचे दर्शन झाल्याने पक्षीप्रेमी व छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तालुक्यामध्ये विविध तलाव, पाणथळीची ठिकाणे, जलाशय व तेथील निरव शांतता विविध प्रकारच्या पक्ष्यांना नेहमीच आकर्षित करत असते. यावर्षी सांगोला तालुक्यातील पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र बुध्देहाळ तलाव जलाशयाची पातळी यावर्षी सुस्थितीत आहे. सांगली जिल्ह्याच्या व सांगोला तालुक्याच्या सीमा भागातील बुद्धेहाळ तलाव येथे जलसंधारणाच्या झालेल्या कामांमुळे पाण्याची पातळी चांगली आहे. बुद्धेहाळ तलावाचे बांधकाम ब्रिटिशांनी १९०२ साली केल्याचा इतिहास आहे. तलावाची उर्वरित कामे १९५७ मध्ये पूर्ण करण्यात आली. सांगोला व आटपाडी या तालुक्यांना पाणीपुरवठा व्हावा या हेतूने बुद्धेहाळ तलावाचे बांधकाम करण्यात आले. तलावास शुक्राचार्य व सांगली जिल्ह्यातील पर्वतरांगांमधून वाहून आलेल्या पाणलोट क्षेत्राचा फायदा होतो. एक हजार १०० दशलक्ष घन लिटरहून अधिक इतकी विशाल साठवण क्षमता आहे. हा तलाव व परिसर येथील निसर्ग, उंच झाडे, तलावाची तटबंदी, ब्रिटिशकालीन बांधकाम असलेला बंगला (गेस्ट हाउस) यामुळे पक्षी व वन्यजीवांसाठी माहेरघर आहे. सध्या तलावावर भारतामध्ये प्रवासी मार्गावरील पक्षी (passage migratory birds) आणि हिवाळे पाहुणे पक्षी (winter visitor) म्हणून ओळख प्राप्त असणारे दुर्मिळ ब्लू-चीक्ड बी-ईटर हे हिवाळी पाहुणे पक्षी म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये दाखल झाले आहेत.

‘ब्लू-चीक्ड बी-ईटर’ (Merops persicus) हा पक्षी वायव्य भारतातून स्थलांतर करताना (प्रवासादरम्यान) आणि हिवाळी पाहुणा म्हणून आढळतो; तर पश्चिम आणि मध्य आशियातील प्रजनन करणारा समूह पाकिस्तान आणि पश्चिम आशियामार्गे प्रवास करतो.
स्थलांतर आणि प्रवासाचा मार्ग
उत्तर आफ्रिका (नाईल डेल्टासह), मध्य पूर्व, तुर्की, कझाकस्तान आणि वायव्य भारतातील काही विशिष्ट भाग (उदा. गुजरात आणि दिल्ली) येथे यांचा प्रसार आढळतो. हे पक्षी पश्चिम आशिया, पर्शियन आखात आणि पाकिस्तानमार्गे वायव्य भारतातील प्रदेशांकडे प्रवास करतात. ऐतिहासिक नोंदींनुसार, हे पक्षी प्रामुख्याने गुजरात (उदा. कच्छ वाळवंट, नल सरोवर) आणि दिल्ली यांसारख्या वायव्य राज्यांमध्ये स्थलांतरादरम्यान आणि हिवाळ्यात आढळतात; तसेच नैऋत्य किनारपट्टी आणि द्वीपकल्पीय भारतापर्यंतही क्वचित प्रसंगी किंवा भटक्या स्वरूपात ते दिसून येतात. अनेक प्रादेशिक गट उष्णकटिबंधीय आणि सहारा-लगतच्या आफ्रिकेकडे (sub-Saharan Africa) जातात, तर काही गट पश्चिम आशिया आणि पश्चिम भारतातील काही भागांतून प्रवास करतात किंवा तिथेच मुक्काम करतात.
हा पक्षी चमकदार हिरव्या रंगाचा असून त्याच्या गालांवर ठळक निळ्या रंगाचा पट्टा असतो. डोळ्यांवर काळी पट्टी आणि घशाजवळ पिवळसर-तपकिरी किंवा पांढरा रंग असतो. याची शेपटी लांब आणि सुईसारखी टोकदार असते. हा पक्षी प्रामुख्याने उडणारे कीटक खातो. यात मधमाश्या आणि गांधीिलमाशी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. विषारी कीटक खाण्यापूर्वी हा पक्षी त्यांना झाडाच्या फांदीवर किंवा तारेवर आदळून त्यांचा विषारी डंक काढून टाकतो. हे पक्षी उष्ण आणि कोरड्या प्रदेशात राहतात. भारतात हे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात यांसारख्या राज्यांत प्रामुख्याने पाहायला मिळतात. महाराष्ट्रात जायकवाडी, भिगवण अशा पाणथळ व मोकळ्या परिसरामध्ये हे थव्याने दिसून येतात. हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून लांबवरून स्थलांतर करून येतात. हे पक्षी सहसा विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारांवर ओळीने बसलेले दिसतात. नदीच्या किंवा तलावाच्या काठावरील वाळूच्या जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून हे आपले घरटे बनवतात.
सांगोला येथील पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे हे बुद्धेहाळ तलाव येथे पक्षी निरीक्षणास गेले असता त्यांना या दुर्मिळ पक्ष्यांच्या पन्नासहून अधिक संख्येच्या मोठ्या थव्याचे दर्शन झाले. सांगोला तालुक्यातून ब्लू चिकड बी इटर पक्ष्यांची एवढ्या मोठ्या संख्येने ही प्रथमव नोंद झाली आहे. सांगोला तालुक्यामध्ये स्थलांतर मार्गावरील प्रवासी पक्षी व हिवाळी परदेशी पाहुणे म्हणून स्थलांतर करून दाखल होतात. सदर पक्षांची नोंद आंतरराष्ट्रीय इ बर्ड प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे
– प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे, पक्षी अभ्यासक, सांगोला


