अवैध वाळू वाहतुकीवर सांगोला पोलिसांची कारवाई; तीन वाहनांसह १७ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त
माण व कोरडा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा; रॉयल्टी व परवानगी नसल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड

अवैध वाळू वाहतुकीवर सांगोला पोलिसांची कारवाई; तीन वाहनांसह १७ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त
माण व कोरडा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा; रॉयल्टी व परवानगी नसल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड
सांगोला (प्रतिनिधी): शासनाची रॉयल्टी न भरता, आवश्यक परवानगी न घेता नदीपात्रातून माण व कोरडे नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात सांगोला पोलिसांनी सलग तीन धडक कारवाया केल्या आहेत. सावे, सांगोला शहर आणि मेडशिंगी परिसरात करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये तीन वाहने व वाळू असा १७ लाख १७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एका कारवाईत वाहनचालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला, तर अन्य दोन प्रकरणांत चालकांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या आदेशानुसार अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पोलीस पथकांकडून विविध भागांत पेट्रोलिंग सुरू होते. याचदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या तीन कारवाया करण्यात आल्या. सावे येथील गावडेवाडी चौकाजवळील माण नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक माण नदीपात्राकडे जात असताना समोरून एक चारचाकी वाहन येताना दिसले. पोलिसांनी वाहनचालकाला हाताचा इशारा करून वाहन थांबविण्यास सांगितले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालकाने वाहन न थांबवता पुढे नेले. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला लावले आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता मागील हौदात अंदाजे एक ब्रास वाळू भरलेली आढळली. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचे वाहन व ७ हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्यात येत आहे.
सांगोला शहरातील वासुद रोड परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी पकडले. पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता मागील हौदात अंदाजे एक ब्रास वाळू आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे वाहन व ७ हजार रुपये किमतीची वाळू ताब्यात घेण्यात आली. वाहन पुढील कारवाईसाठी सांगोला पोलीस ठाण्यात आणून लावण्यात आले.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस पथक मेडशिंगी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना कोरडा नदीपात्रातून चारचाकी वाहनाद्वारे वाळूचा अवैध उपसा व वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेनुसार पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी धाव घेतली. कोरडा नदीपात्रातून एक अशोक लेलंड कंपनीचे चारचाकी वाहन येताना पोलिसांना दिसले. वाहनचालकाला थांबविल्यानंतर पोलिसांनी वाहनाच्या हौदाची तपासणी केली. त्यामध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू भरलेली आढळली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता परवाना नसल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचे वाहन व ३ हजार रुपये किमतीची वाळू असा मुद्देमाल जप्त केला.
तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मारुती पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे, पोलीस कॉन्स्टेबल संकेत गोरे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.



