गुन्हेगारी

घातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या ७ सराईत गुन्हेगारांची टोळी शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद

देशी पिस्तुल, पाच जिवंत राऊंड, तलवारी, खंजीर, कटावणी, दोरखंड अन् हॅन्डग्लोज पोलिसांच्या हाती; सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

घातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या ७ सराईत गुन्हेगारांची टोळी शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद

देशी पिस्तुल, पाच जिवंत राऊंड, तलवारी, खंजीर, कटावणी, दोरखंड अन् हॅन्डग्लोज पोलिसांच्या हाती; सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर शहरात दरोडा टाकून लूट करण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला सोलापूर शहर गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले. ही कारवाई रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगाव रोड परिसरात करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल, पाच जिवंत राऊंड, दोन तलवारी, तीन खंजीर, दोन कटावणी, छन्नी, लांब दोरखंड, हॅन्डग्लोज, कलर स्प्रे, सात मोबाईल, दोन नंबर प्लेट, चारचाकी वाहन आणि मोटारसायकल असा तब्बल १० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे सोलापूर शहरात मोठा दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पोलिसांकडून विशेष गस्त घालण्यात येत आहे. मालाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची पथके सक्रिय होती. दि. २० सप्टेंबर रोजी रात्री सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव व त्यांचे पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई अमोल यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. सोलापूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत काही जण असून ते मुळेगाव रोडवरील अमर ज्योती नगर, नरसिंग नगरच्या शेजारी प्लॉट क्रमांक ८३ परिसरात जमले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या टोळीकडे घातक शस्त्रे असून काळ्या रंगाचे चारचाकी वाहन व मोटारसायकल असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, सहायक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसराची पाहणी केली. पोलिसांना बातमीतील वर्णनाप्रमाणे काळ्या रंगाचे चारचाकी वाहन आणि एक मोटारसायकल दिसून आली. चारचाकी वाहनाजवळ सात जण संशयास्पदरीत्या थांबलेले आढळले. दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने सातही जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता अंकुर रामकुमार प्रतापसिंह याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि पाच जिवंत राऊंड आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी गाडी आणि मोटारसायकलची तपासणी केली. त्यावेळी चारचाकी वाहनामध्ये दोन तलवारी, तीन खंजीर, दोन कटावणी, एक छन्नी, लांब दोरखंड, तीन जोड हॅन्डग्लोज, दोन नंबर प्लेट, एक कलर स्प्रे बॉटल आणि सात मोबाईल असा मोठा मुद्देमाल आढळून आला.

सदर साहित्याबाबत पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता राजेश कन्नीराम राठोड याने त्या रात्री सोलापूर शहरात दरोडा टाकून लूट करण्याची तयारी केली होती आणि त्यासाठी दिवसभरात हत्यारे व इतर साहित्य जमा केल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईत सोलापूर शहर पोलिसांनी मनदीपसिंग दयासिंग संधू रा. गुरुद्वारा लंगर साहिब, नगिना घाट, नांदेड, बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा, रा. खैरा निवास, बडपुरा, नांदेड, अंकुर रामकुमार प्रतापसिंह, रा. तारवा, पोस्ट अरप, जि. पटना, बिहार. लक्ष्मण नामदेव जगताप, रा. भागगाव, छत्रपती संभाजीनगर, सुखदेवसिंग बलविंदरसिंग गिल, रा. वैरोवाल, जि. तरनतारण, पंजाब. दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा, रा. ब्रम्हसिंग नगर, नांदेड, राजेश कन्नीराम राठोड रा. नरसिंह नगर, मुळेगाव रोड, सोलापूर यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या तपासानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काहींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. मनदीपसिंग दयासिंग संधू याच्यावर नांदेड जिल्ह्यात आर्म्स अँक्ट, खून, कटाचा आरोप आणि दरोड्याच्या तयारीशी संबंधित गुन्हे दाखल आहे. अंकुर रामकुमार प्रतापसिंह याच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात दरोडा, गंभीर दुखापत व आर्म्स अँक्टअंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लक्ष्मण नामदेव जगताप याच्यावर छत्रपती संभाजीनगर परिसरात खून व इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या अभिलेखातून समोर आले आहे.दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा याच्यावर नांदेड जिल्ह्यात आर्म्स अँक्टसह खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी आदी स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर राजेश कन्नीराम राठोड याच्यावर सोलापूर शहरासह इतर ठिकाणी जबरी चोरी, अपहरण, चोरी तसेच दरोड्याशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं. ८४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१)(२), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातही आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरोडा टाकण्यापूर्वीच शस्त्रसाठ्यासह सात संशयितांना पकडण्यात आल्याने शहर गुन्हे शाखेच्या या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आरोपींकडून मिळालेली शस्त्रे, दोरखंड, हॅन्डग्लोज, कलर स्प्रे आणि अतिरिक्त नंबर प्लेट यामुळे पोलिसांकडून या टोळीच्या संभाव्य गुन्हेगारी कारवायांचा अधिक तपास केला जात आहे. या टोळीने यापूर्वी सोलापूर शहर किंवा परिसरात आणखी काही गुन्हे केले आहेत का, तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का, याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, निलेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे, मनोज मोरे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

या कारवाईत गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार अंकुश मोसले, नंदराम गायकवाड, जावीद जमादार, विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, वाजीद पटेल, बापू साठे, योगेश बडे, आबाजी सावळे, धीरज सातपुते, अमोल यादव, विठ्ठल यलमार, गणेश शिंदे, अमिजीत पवार, शंकर याळगी, सुभाष मुंढे, सोपान सय्यद, वसीम शेख, युवराज गायकवाड, भारत पाटील, विशाल कुलकर्णी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे मच्छींद्र राठोड, चालक शाम सुरवसे, परवत आणि राजशेखर पाटील यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!