सांगोले नगरपरिषदेचा २२९.७९ कोटींचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर
भुयारी गटार, पाणीपुरवठा, रस्ते विकासाला प्राधान्य

सांगोले नगरपरिषदेचा २२९.७९ कोटींचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर
भुयारी गटार, पाणीपुरवठा, रस्ते विकासाला प्राधान्य
सांगोला (प्रतिनिधी): सांगोले नगरपरिषदेची सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीची अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. या सभेत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा सुधारीत अर्थसंकल्प तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मानल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पात मूलभूत सुविधा, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक कल्याण योजनांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी तयार केलेला अर्थसंकल्प स्थायी समितीने सुचविलेल्या दुरुस्त्या व शिफारशींसह सभेसमोर सादर करण्यात आला. नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या वतीने नगरपरिषदेचे लेखापाल हरीभाऊ काळे आणि लेखापरीक्षक लहु लेंगरे यांनी अर्थसंकल्पाचे सविस्तर विवेचन केले.
मंजूर अर्थसंकल्पानुसार जमा बाजूस आरंभीच्या शिल्लकेसह महसुली जमा व शासन अनुदाने मिळून एकूण रु. २२९,७९,७४,५३९/- इतकी तरतूद करण्यात आली आहे. खर्च बाजूस महसुली व शासन अनुदानातून रु. २२९,७८,२३,७४०/- इतका खर्च दर्शविण्यात आला असून अखेरची शिल्लक रु. १,५०,७९९/- इतकी राहणार आहे.
विकासकामांना भरीव तरतूद
अर्थसंकल्पात नगरोत्थान अभियान राज्यस्तरांतर्गत भुयारी गटार योजना, अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा, नगरोत्थान अभियान जिल्हास्तर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना, दलितेतर योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना, विशेष रस्ता अनुदान, अल्पसंख्याक बहूल क्षेत्र विकास योजना, रमाई आवास घरकुल योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध योजनांसाठी भरीव निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
तसेच शहरातील बगीचे व सार्वजनिक इमारतींचे बांधकाम, स्मशानभूमी व दफनभूमी सुधारणा, नवीन रस्ते व विद्यमान रस्त्यांची दुरुस्ती, नवीन पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन, आवश्यक विद्युत व्यवस्था, तसेच नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणीशुद्धीकरण यंत्रणा उभारणीसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना
नगरोत्थान अभियान राज्यस्तरांतर्गत मंजूर भुयारी गटार योजनेमुळे शहरातील सांडपाण्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणार असून पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होणार आहे. या माध्यमातून शहरात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
सामाजिक बांधिलकीचा ठसा
महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, तसेच दुर्बल घटकांच्या विकासासाठी विधिवत तरतूद करण्यात आली आहे. शहरातील राष्ट्रपुरुष व समाजसुधारकांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यासाठीही अर्थसंकल्पात निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींची उपस्थिती
सभेस नगराध्यक्ष आनंदा माने, उपाध्यक्ष नितीन इंगोले, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, सर्व विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
“समृद्ध आणि स्मार्ट सांगोले”चा संकल्प
अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर नगराध्यक्ष आनंदा माने यांनी सांगोले शहराच्या प्रगतीला नवी गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. “शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा आणि पर्यावरणासोबत विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी विशेष तरतुदींचा या अर्थसंकल्पात समावेश आहे. चला, समृद्ध आणि स्मार्ट सांगोलेच्या निर्मितीत सहभागी होऊया,” असे आवाहन त्यांनी केले.
शहराच्या विकासाचा पाया मजबूत करणारा हा अर्थसंकल्प आगामी वर्षात सांगोलेच्या बदलत्या रूपाचा दिशा निर्देशक ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



