राजकीय

ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यातील ७०२ ग्रामपंचायतींची रणधुमाळी! २४ जुलैला प्रारूप मतदार यादी

निवडणूक प्रक्रियेला वेग, सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात

ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यातील ७०२ ग्रामपंचायतींची रणधुमाळी! २४ जुलैला प्रारूप मतदार यादी

निवडणूक प्रक्रियेला वेग, सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात

सोलापूर (प्रतिनिधी): राज्यातील मुदत संपलेल्या, मुदत संपण्याच्या मार्गावर असलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून ऑक्टोबर २०२६ मध्ये राज्यभरातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक हालचाली सुरू केल्या असून २४ जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय घडामोडींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राज्यातील २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व २०२६ मधील मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने तयार झालेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी आधारभूत मानण्यात येणार आहे. प्रभागनिहाय मतदार याद्यांचे प्रकाशन झाल्यानंतर मतदारांना हरकती व सूचना नोंदविण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून २४ ते २९ जुलै दरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. या हरकतींची छाननी करून ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपली नावे, पत्ते व इतर तपशील तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ७०२ ग्रामपंचायतींची निवडणूक यावेळी होणार असल्याने ग्रामीण राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात नाराजी असून नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे. गावोगावी बैठका, गाठीभेटी आणि मतदार संपर्क मोहिमा सुरू झाल्या आहेत.

 

तालुकानिहाय ग्रामपंचायती

मंगळवेढा – ३०

पंढरपूर – ७८

करमाळा – ५४

माढा – ५८

माळशिरस – ५७

बार्शी – १००

मोहोळ – ९६

अक्कलकोट – ७७

दक्षिण सोलापूर – ५४

सांगोला – ६७

उत्तर सोलापूर – २४

 

मतदार यादीची प्रक्रिया अशी

२४ जुलै : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

२४ ते २९ जुलै : हरकती व सूचना स्वीकारणे

४ ऑगस्ट : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

त्यानंतर : निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

 

ग्रामपंचायत निवडणुका या ग्रामीण भागातील राजकारणाचा पाया मानल्या जातात. त्यामुळे आगामी निवडणुकीत स्थानिक विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, रोजगार आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी हे प्रमुख मुद्दे राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकांमुळे ग्रामीण राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!