गुन्हेगारी

आषाढी वारीपूर्वी एलसीबीची मोठी कारवाई; मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे २० लाखांचा गांजा जप्त

मोहोळ तालुक्यात खळबळ, एकाविरुद्ध गुन्हा दाखल, तीन दिवसांची पोलिस कोठडी 

आषाढी वारीपूर्वी एलसीबीची मोठी कारवाई; मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे २० लाखांचा गांजा जप्त

मोहोळ तालुक्यात खळबळ, एकाविरुद्ध गुन्हा दाखल, तीन दिवसांची पोलिस कोठडी 

 

सांगोला (प्रतिनिधी): आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि मोहोळ पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत शेतातील जनावरांच्या गोठ्यात लपवून ठेवलेला तब्बल ४० किलो ३८५ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची अंदाजे किंमत २० लाख १९ हजार २५० रुपये असून, या प्रकरणी भैरवनाथ भोसले अंकोली (ता. मोहोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसले यास अटक करून मोहोळ येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

 

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध अंमली पदार्थ व दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागांत गस्त व शोधमोहीम सुरू होती. १६ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोहोळ परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अंकोली येथील भैरवनाथ भोसले यांनी त्यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवला आहे.

ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्याच्या मदतीने तातडीने छापा टाकण्यात आला. पोलिसांनी गोठ्याची झडती घेतली असता तेथे दोन प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये संशयास्पद पदार्थ आढळून आला. सदर पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये हिरवट रंगाची पाने, बिया व गांजासदृश पदार्थ आढळून आला. अधिक तपासणीत हा पदार्थ गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी दोन्ही पोत्यांमधील एकूण ४० किलो ३८५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २० लाख १९ हजार २५० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संशयित भैरवनाथ भोसले (रा. अंकोली, ता. मोहोळ) यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कलमान्वये अन्वये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून, गुंगीकर औषधी द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे अमली पदार्थ अधिनियमा नुसार भैरवनाथ भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप, पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप तसेच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि भिमगोंडा पाटील, पोलीस हवालदार सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल आश्विनी गोटे, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, चापोकॉ दिलीप थोरात तसेच मोहोळ पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन आतकरे, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ पाटील व पोलिस कर्मचारी यांनी ही कामगिरी बजावली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!