गुन्हेगारी

ज्वारीच्या पिकात गांजाची शेती! घेरडीत एलसीबीची धडक कारवाई; ४.१७ लाखांचा गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगोला पोलिसांची धडक कारवाई

ज्वारीच्या पिकात गांजाची शेती! घेरडीत एलसीबीची धडक कारवाई; ४.१७ लाखांचा गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगोला पोलिसांची धडक कारवाई

सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील घेरडी येथील दिवाणवस्ती परिसरात ज्वारीच्या पिकाच्या आड गांजाची लागवड करून अंमली पदार्थांचे उत्पादन घेत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगोला पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून तब्बल ८ किलो ३४२ ग्रॅम वजनाचा आणि ४ लाख १७ हजार १०० रुपयांचा गांजा जप्त केला असून, या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नारायण रामचंद्र गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाजीराव संपत यमगर (वय ५०, रा. दिवाणवस्ती, घेरडी) याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात लपूनछपून सुरू असलेल्या गांजाच्या लागवडीवर पोलिसांनी कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक म. इसाक अब्बास मुजावर, सफौ नारायण रामचंद्र गोलेकर, पोहेकॉ मोहन मनसावाले, पोकॉ अक्षय डोंगरे, पोकॉ पाथरूट, चापोकॉ सतिश बुरकुल, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण असे शासकीय वाहन क्रमांक एमएच 13 डीएम 9440 या वाहनाने पेट्रोलिंग करीत घेरडी ता. सांगोला येथे पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत घेरडी शिवारातील दिवाणवस्ती येथील विहिरीलगत असलेल्या ज्वारीच्या शेतामध्ये गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच त्या ठिकाणी सांगोला पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, पोहेकॉ जमीर शेख, पोना अंकुश नलवडे, पोकॉ अशोक मासाळ हजर झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. मंगळवेढा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर एनडीपीएस कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करून पुढील कारवाई करण्याचे आदेश मिळाले. स्थानिक गुन्हे शाखा व सांगोला पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक दिवाणवस्ती परिसरात दाखल झाले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता ज्वारीच्या पिकाच्या आड गांजाची तीन झाडे आढळून आली. दोन झाडांचा पाला आणि फांद्या कापून वाळवण्यासाठी बाजूला ठेवण्यात आल्या होत्या, तर एक झाड पूर्णपणे हिरव्या अवस्थेत उभे होते. झाडांची छाटणी करून पाने, देठ व इतर भाग एकत्रित केल्यानंतर त्याचे वजन ६ किलो ३५७ ग्रॅम भरले. याशिवाय झाडाखाली स्वतंत्रपणे ठेवलेला १ किलो ९८५ ग्रॅम हिरवा गांजा देखील जप्त करण्यात आला. प्रतिकिलो ५० हजार रुपये बाजारभाव गृहित धरून एकूण ४ लाख १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात बाजीराव यमगर यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता आपल्या गट क्रमांक १०८९ मधील ज्वारीच्या शेतामध्ये गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ चे कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर पोलिसांनी गांजाची लागवड केवळ स्वतःच्या वापरासाठी होती की त्यामागे अमली पदार्थांच्या विक्रीचे मोठे जाळे कार्यरत आहे, याचा तपास सुरू केला आहे. जप्त केलेला गांजा कुठे आणि कोणाला विकला जाणार होता, याबाबतही चौकशी करण्यात येत आहे. घेरडीसारख्या ग्रामीण भागात ज्वारीच्या शेतामध्ये गांजाची लागवड आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांची बेकायदा लागवड करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात अशाच प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!