सामाजिक

उद्योगविश्वातील योद्धा…. अनिलभाऊ इंगवले

उद्योगविश्वातील योद्धा…. अनिलभाऊ इंगवले

यशस्वी माणसं वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ती प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात आणि त्या वेगळेपणाची चुणूक हाती घेतलेल्या प्रत्येक कामात दाखवतात. ‘सूर्योदय उद्योग समूहातील’ प्रत्येक उद्योग आणि व्यवसायांवरती आपल्या कार्यकुशलतेचा व कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे, स्वतः शंभर पावले पुढे टाकण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन एक एक पाऊल पुढे टाकण्यात आनंद मानणारे, आधुनिक विचारांचे प्रगल्भ नेते म्हणजे अनिलभाऊ इंगवले.

संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मिळून लाखो समाधानी ग्राहक असलेल्या, हजारो सभासदांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणाऱ्या आणि शेकडो तरुणांच्या हाताला काम देत मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती करणाऱ्या ‘सूर्योदय उद्योग समूहाचे’ संस्थापक त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात मिळून सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाच्या सुमारे 200 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी चे चेअरमन, चळवळीचा पिंड असलेले अभ्यासु व्यक्तिमत्व व आमचे परममित्र माननीय अनिलभाऊंचा आज वाढदिवस.

आपल्या मागे किती जण उभे आहेत, यापेक्षा आपण किती जणांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहू शकतो, याचाच सतत ध्यास घेत मराठी माणूस उद्योग आणि व्यवसायात पुढे जायला हवा. हा विचार करत परिसरातील कितीतरी छोट्या-मोठ्या व्यवसायिक आणि उद्योजकांच्या पाठीशी अनिलभाऊ स्वतःच्या विचारांची शक्ती उभे करतात. ना पैसा बडा, ना पद बडा, मुसिबत मे जो साथ खडा, वो सबसे बडा.

११ जून 1981 रोजी मेडशिंगी येथील बुरलेवाडी सारख्या छोट्याशा वस्तीवर शेतकरी कुटुंबात जन्म. जात्यावरच्या ओविंपासून अनेक प्रकारच्या ग्रामीण लोकगीतांचा वारसा जपणाऱ्या समर्थभक्त सौ शालनताई इंगवले या माता आणि शेळ्या मेंढ्यांपासून सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांवर दया करत मनापासून काळया आईची मशागत करणाऱ्या कुबेरभाऊ इंगवले सारख्या पित्याच्या पोटी जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीत देखील समाजसेवा, लोकचळवळ आणि सतत नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याची उमेद कायम जोपासली. अनुकूल आणि प्रतिकूल अशा कोणत्याही परिस्थितीत कायम साथ देणाऱ्या सुविद्य पत्नी सौ अर्चनाताई, मुलगा ओमराजे आणि गुणवंत व उच्चशिक्षित मुलगी डॉ यशश्री ही कौटुंबिक पार्श्वभूमी.

स्वतःच्या परिस्थितीला जे स्वतःची ताकद बनवतात. ते आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत, हे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले. आयुष्यात काही वादळ आपणास विचलित करण्यासाठी नव्हे तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. असा अत्यंत सकारात्मक विचार करत आयुष्यातील कितीतरी आव्हानांना ते पुरून उरले आहेत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ट्रॅव्हल्स पावती बुकिंग करणे, स्वतःच स्थापन केलेल्या पतसंस्थेमध्ये सचिव म्हणून काम करणे, हॉटेल व्यवसाय असो, खते बी बियाणांचे दुकान असो, बी बियाण्यांच्या कंपनीमध्ये मार्केटिंगची नोकरी असो तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, साखर कारखान्यातील छोटी छोटी कामाची टेंडर घेणे अशी कितीतरी कामे नि :संकोचपणे ते करत राहिले. काम लहान असो की मोठे प्रत्येक कामात त्यांच्या बुद्धी कौशल्याची चूनुक दिसून येते.

माझी आणि अनिलभाऊंची सुमारे 25 वर्षापासूनची घट्ट मैत्री आहे. त्यांच्या आयुष्यातील कितीतरी बऱ्या वाईट प्रसंगांचा मी जवळचा साक्षीदार आहे .जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते तेव्हा देखील आणि आजही अफाट कष्टाची कोणत्याही वेळी तयारी असणारा त्यांचा स्वभाव अतिशय कौतुकास्पद आहे. ज्यांच्याजवळ उमेद आहे, तो कधीच हारू शकत नाही. सन 2010 साली त्यांनी मला तसेच डॉ बंडोपंत लवटे आणि सुभाष दिघे गुरुजींना सोबत घेऊन मेडशिंगी या ठिकाणी ‘सूर्योदय गोल्ड फायनान्स’ नावाचे पहिले युनिट उभे केले. बघता बघता ‘सूर्योदय महिला बचत गट’, ‘पुरुष बचत गट’, ‘निधी कंपनी’, ‘सूर्योदय अर्बन’, ‘सूर्योदय महिला अर्बन’, कापड उद्योग, मोबाईल शोरूम, ज्वेलर्स आणि एल के पी मल्टीस्टेट अशा अनेक संस्था आणि उद्योगांच्या प्रवासात एका छोट्याशा युनिटचे विशाल अशा औद्योगिक वटवृक्षात रुपांतर झाले. आज सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडत महाराष्ट्रभर किंबहुना कर्नाटक राज्यांपर्यंत विविध उद्योगांच्या माध्यमातून ‘सूर्योदय उद्योग समूह’ कार्यरत आहे.

अनिलभाऊंच्या कुशल नेतृत्वाखाली आणि सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक डॉ बंडोपंत लवटे यांच्या अभ्यासू मार्गदर्शनाखाली ‘सूर्योदय दूध विभाग’ अतिशय सक्षमपणे वाटचाल करत आहे. कोणतेही काम बोलघेवड्या बातांनी नव्हे तर कर्तुत्व संपन्न हातांनी फत्ते होते. सूर्योदय उद्योग समूहातील प्रत्येक संस्था आणि उद्योगात अनिलभाऊंच्या कुशल कार्यकर्तुत्वाची छाप उमटलेली आहे. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरांमध्ये सूर्योदय वस्त्रनिकेतन, फर्निचर आणि बझार अशा सर्व बाबींनी सुसज्ज असलेले सुमारे 42 हजार स्क्वेअर फुटाचे, सांगोला शहर आणि तालुक्याच्या वैभवात मोलाची भर घालणारे ‘सूर्योदय मॉल’ हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे खरेदी दालन आपली सेवा देत आहे.

संस्था, व्यवसाय आणि उद्योगांची ‘गगनभरारी’ एका बाजूला सुरु असताना सूर्योदय सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून आजवर कितीतरी मनोरंजन आणि प्रबोधनाचे उपक्रम घेतलेले आहेत. त्याचबरोबर सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून गुणवंतांचे सन्मान, वृक्षारोपण, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, समाजासाठी अत्यंत उपयुक्त अशी रक्तदान शिबिरे, दिंडी, सप्ताह आणि विविध मंडळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ‘अन्नदान सेवा’ ग्रामीण भागातील भाविकांना तीर्थयात्रा दर्शन, जलसंधारण अशा कितीतरी उपक्रमांद्वारे लोकोपयोगी समाजकार्याचा डोंगर उभा करणारा सूर्योदय परिवार.
या सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध क्षेत्रातील नामवंत अशा हजारोंचा मित्रसंग्रह जोडणारा हा व असाधारण असामी. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परमेश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. इतरांच्या समाधान व आनंदासाठी सदैव झटणारा सदाहरित नेता म्हणजे अनिलभाऊ. सूर्योदय उद्योग समूहातील प्रत्येक घटकांवर स्वतःच्या नेतृत्वाची छत्रछाया कायम राखत महाराष्ट्रातील एक नामवंत वित्तीय संस्था एल के पी मल्टीस्टेट आणि सोलापूर जिल्ह्यातील एक नामवंत आर्थिक संस्था सूर्योदय अर्बन या दोन संस्थांचा आव्हानात्मक डोलारा लीलया पेलणारा कणखर नेता, स्वतःच्या समर्थ अशा दोन्ही हातामध्ये ‘आयुध’ घेऊन एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर पराक्रम गाजवणाऱ्या इतिहासातील एखाद्या सम्राटासारखा. सहकारातील आणि उद्योगविश्वातील योद्धा….. अनिलभाऊंना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा…….

जगन्नाथ भगत गुरुजी.
सह संस्थापक…सूर्योदय उद्योग समूह.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!