पेट्रोलला जास्त पैसे घेतल्याने कोयत्याने केला वृद्धाचा खून
सांगोला पोलिसांची कामगिरी; खुनाच्या घटनेचा पाच तासांत लावला छडा, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पेट्रोलला जास्त पैसे घेतल्याने कोयत्याने केला वृद्धाचा खून
सांगोला पोलिसांची कामगिरी; खुनाच्या घटनेचा पाच तासांत लावला छडा, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सांगोला (प्रतिनिधी): पेट्रोलला जास्त पैसे घेतल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या तरुणाने आपल्या भावकीतील ७६ वर्षीय वृद्धाचा कोयत्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोळा (ता. सांगोला) येथे घडली. या प्रकरणाचा सांगोला पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. बाबासो भानुदास देशमुख (वय ७६, रा. बाणुरगड, ता. खानापूर, जि. सांगली) असे मृताचे नाव असून बाणुरगड येथील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासो देशमुख यांचे बाणुरगड येथे किराणा दुकान असून ते किरकोळ प्रमाणात पेट्रोलची विक्रीही करत होते. सुमारे १५ दिवसांपूर्वी संशयित आरोपीने त्यांच्या दुकानातून एक लिटर पेट्रोल घेतले होते. त्यावेळी माझ्याकडून जास्त पैसे का घेतले असा जाब आरोपीने विचारत त्यांच्याशी वाद घातला होता. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास बाबासो हे दुचाकीवरून कोळा येथील आठवडा बाजारासाठी आले. त्यांनी मित्राकडे दुचाकी दुरुस्तीसाठी दिली. त्यानंतर संशयित आरोपीने बाबासो यांना दुचाकीवरून मटण खाण्यासाठी घेऊन गेला. वाटेत बाणूरगड ते कोळे कॅनालजवळ कोयत्याने त्यांच्या मानेवर, डोक्यात मारून जीवे ठार मारून तेथून निघून गेला. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली अन् पोलिसांनी माहिती मिळाली.
खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. तपासाची सूत्रे वेगाने हलवली. श्वानपथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅब यांची मदत घेतली. या खुनाविषयी कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी गोपनीय माहिती आधारे अवघ्या पाच तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, अनिल बाबासो देशमुख रा. बानुरगड ता. खानापुर जि. सांगली यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २४ एप्रिल रोजी त्यांचे वडील बाबासो भानुदास देशमुख वय 76 वर्षे रा. बानुरगड ता. खानापुर जि. सांगली हे कोळा ता. सांगोला येथे आठवडा बाजाराकरीता जात असल्याचे सांगुन कोळा येथे गेले होते. संध्याकाळी वडील घरी आले नसल्याने अनिल याने वडीलांना फोन केला परंतु त्यावेळी देखील त्यांनी फोन रिसीव्ह केला नाही. त्यामुळे त्यांनी कोळा ता. सांगोला येथील ओळखीचे दिपक तेली यांना फोन करुन वडील बाबासो तुमचे घरी आले होते का असे विचारले. परंतु त्यांनी घरी आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी कोळा येथील नातेवाईकांकडे देखील चौकशी केली, परंतु बाबासो यांचा शोध लागला नाही. त्यानंतर चुलत भाऊ गिरीश, शेजारी राहणारे रोहीत गायकवाड, प्रशांत गायकवाड, गावातील महेश जाधव, दिलीप देशमुख हे सर्वजण बाबासोयांचा शोध घेण्यासाठी कोळा येथे आले.
दरम्यान, २५ एप्रिल रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास कोळा ता. सांगोला येथील म्हसोबा मंदीराकडे जाणारे रोडवर कॅनलच्या बाजुला शेतामध्ये बाबासो देशमुख हे डोकीस, हातापायावर गंभीर जखमा होवुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यांच्या गळ्यातील लॉकेट, सोन्याची चैन तसेच एक तोळा वजनाची अंगठी अंगावर नसल्याची दिसून आली. अज्ञान इसमाने बाबासो देशमुख यांचा खून केला असल्याची फिर्याद मुलगा अनिल देशमुख यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली होती. अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे वेगाने हलवली. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे यांनी अवघ्या पाच तासात खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत संशयित आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर संशयित आरोपीने खुनाची कबुली दिली असून अधिक तपास सांगोला पोलीस करीत आहेत.



