मोबाईल दुकान फोडीचा गुन्हा उघड; कर्नाटकातून आरोपी जेरबंद, २० मोबाईल जप्त
सायबर ट्रेसिंगमुळे सांगोला पोलिसांना यश; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मोबाईल दुकान फोडीचा गुन्हा उघड; कर्नाटकातून आरोपी जेरबंद, २० मोबाईल जप्त
सायबर ट्रेसिंगमुळे सांगोला पोलिसांना यश; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सांगोला (प्रतिनिधी): शहरातील वासुद चौक येथील सुर्योदय मोबाईल शॉपी फोडून लाखो रुपयांच्या मोबाईलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे. कर्नाटकातील बागलकोट येथून एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून तब्बल २० मोबाईल जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १.१८ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सूर्योदय मोबाईल शॉपी या दुकानाच्या वरचा पत्रा उचकटून व पीओपी फोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर दुकानातील सुमारे ३ लाख ९० हजार ५०० रुपयांचे विविध कंपनीचे मोबाईल फोन लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२०/२०२५ बीएनएस कलम ३३४(१), ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल ट्रेस केला. त्याच्या आधारे तपासाची दिशा स्पष्ट झाली आणि पोलिसांनी थेट कर्नाटक राज्यातील बागलकोट येथे धाड टाकली. या कारवाईत अक्षय शांताराम इंदुलकर (वय ३६, रा. नवनगर, बागलकोट) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून एकूण २० मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत ३ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे (मंगळवेढा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पोहेकॉ दत्ता वजाळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विशाल भोसले, पोलिस कॉन्स्टेबल शहाजहान शेख तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल राहुल सोनकर यांनी विशेष भूमिका बजावली.



