पोलीस ठाण्यात वकिलास मारहाण; पीआय विनोद घुगे अडचणीत
सांगोला बार असोसिएशन आक्रमक; कामबंद आंदोलनातून कारवाईची मागणी

पोलीस ठाण्यात वकिलास मारहाण; पीआय विनोद घुगे अडचणीत
सांगोला बार असोसिएशन आक्रमक; कामबंद आंदोलनातून कारवाईची मागणी
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरात कायदा- सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना समोर आली असून, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरातच एका वकिलास मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे वकिलांमध्ये तीव्र संताप उसळला असून, सांगोला विधीज्ञ संघाने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (दि. २ एप्रिल) कामबंद आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
मारहाण झालेल्या वकिलाचे नाव ॲड. सागर बंडू मेटकरी असे असून, त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार मंगळवार (दि. ३१ मार्च) रोजी सांगोल्यात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच प्रकरणातील अटक असलेले रावसाहेब मेटकरी यांनी बोलावल्यावर ॲड. सागर मेटकरी हे चौकशीसाठी सांगोला पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी पोलीस निरीक्षक घुगे यांनी “तू इथे कशाला आला?” अशी विचारणा करत, “जे काही करायचं ते कोर्टात बघ” असे सांगून अचानक ॲड. मेटकरी यांच्या कानशिलात लगावल्याचे निवेदनात म्हटले आहे.
स्वतः वकील असल्याचे सांगीतल्यावर चिडून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ॲड सागर मेटकरी यांना शिवीगाळ मारहाण केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याचवेळी उपस्थित असलेल्या ५ ते ६ पोलीस कर्मचाऱ्यांनीही ॲड. मेटकरी यांना जबरदस्तीने एका पत्र्याच्या खोलीत नेऊन मारहाण केली. त्यांचा मोबाईलही काढून घेतला गेला आणि मध्यरात्रीपर्यंत त्यांना तिथेच बसवून ठेवण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर “तक्रार केली तर खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकू” अशी धमकी देण्यात आल्याचेही ॲड. मेटकरी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सांगोला विधीज्ञ संघाने तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत ॲड. सागर मेटकरी यांनी संपूर्ण प्रकार सांगोला बार कौन्सिलच्या समोर मांडला. त्यानंतर संतप्त वकिलांनी एकमताने ठराव मंजूर करत पोलीस निरीक्षक विनोद घुगे व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २ एप्रिल) सांगोला येथील सर्व वकिलांनी कामबंद आंदोलन पुकारत सांगोला पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून लेखी निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.



