सांगोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ..! मार्केट यार्डात दिवसाढवळ्या अडीच लाखांची थरारक चोरी
जनावरे चोरांची पुन्हा दहशत! गवंडवस्ती परिसरातून मुऱ्हा जातीची म्हैस व रेडकू चोरट्यांनी पळविले

सांगोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ..! मार्केट यार्डात दिवसाढवळ्या अडीच लाखांची थरारक चोरी
जनावरे चोरांची पुन्हा दहशत! गवंडवस्ती परिसरातून मुऱ्हा जातीची म्हैस व रेडकू चोरट्यांनी पळविले
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. चोरट्यांनी सांगोला शहरातील मार्केट यार्ड परिसरातून दिवसाढवळ्या अडीच लाख रुपयांची रोकड लंपास करून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. त्याचवेळी जनावरे चोरणाऱ्या टोळीनेही ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीची जनावरे लक्ष्य केल्याने आर्थिक नुकसानासह असुरक्षिततेची भावना वाढली आहे. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे. चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करून आरोपींना जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून पुढे येत आहे.
सांगोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. डाळिंब विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याच्या वाहनातील अडीच लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी घडली. सोनंद येथील रवींद्र तेली यांनी स्टेट बँक सांगोला येथून अडीच लाख रुपये काढले होते. ते पैसे त्यांनी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून एम.एच.४५ ए.एफ.७०५३ या चारचाकी वाहनाच्या डॅश बोर्डच्या डावीकडील कप्यात ठेवले होते.
त्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास सांगोला मार्केट यार्डमध्ये राजलक्ष्मी फुट कंपनी येथे डाळिंब विक्रीसाठी जाऊन गाडी लॉक करुन डाळींब विक्रीसाठी माल उतरत होते. दरम्यान, डाळींब विक्री करुन घरी जाण्यासाठी रवींद्र तेली हे वाहनाजवळ गेले असता त्यांना वाहनाची काच अर्धवट उघडी दिसली. तेव्हा त्यांनी गाडीच्या डॅशबोर्डच्या डावीकडील कप्यात ठेवलेल्या पैशाच्या कॅरीबॅगची खात्री केली असता पैशाची असलेली कॅरीबॅग दिसून आली नाही. अशोक लेलंड वाहनाच्या डावीकडील अर्धवट उघड्या असलेल्या काचेतून हात घालुन डॅशबोर्डच्या डावीकडील कप्यात ठेवलेली पैशाची कॅरीबॅग कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली असल्याचे खात्री झाली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.
सांगोला तालुक्यातील भोपसेवडी येथील गवंडवस्ती परिसरात जनावरे चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत शेतकऱ्याची मुऱ्हा जातीची म्हैस व तिचे रेडकू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हणमंत शंकर नरळे (वय ५०, रा. भोपसेवडी, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते शेती व पशुपालन व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गवंडवस्ती येथील शेतामध्ये पत्र्याचे शेड असून तेथे गाय, कालवड, म्हैस व रेडकू अशी जनावरे दररोज रात्री बांधली जातात. दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री नेहमीप्रमाणे जनावरे शेडसमोरील मोकळ्या जागेत बांधून ते घरी गेले. दि. ३ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता शेजारी राहणारे सिद्धेश्वर मारुती माळी यांनी फोन करून गाय व कालवड सुटून त्यांच्या दारात आल्याची माहिती दिली. मात्र म्हैस व रेडकू दिसले नसल्याचे त्यांनी सांगितले.
ही माहिती मिळताच हणमंत नरळे यांनी तातडीने शेत गाठले. तेथे पाहणी केली असता मुऱ्हा जातीची म्हैस व तिचे लहान रेडकू जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूचा परिसर तसेच शेजारील गावांमध्ये शोध घेतला. मात्र जनावरे मिळून न आल्याने अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेल्याची खात्री झाली. अज्ञात चोरट्याने ४० हजार किंमतीची मुऱ्हा जातीची म्हैस आणि ३ हजार किंमतीचे लहान रेडकू, असा एकूण ४३ हजार रुपये किमतीची जनावरे चोरून नेली अशी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



