शैक्षणिक

कुस्ती अन् वेटलिफ्टिंगमध्ये जवळे विद्यालयाचा दबदबा!

१२ कुस्तीपटू जिल्हास्तरावर; गौरी यंपेची वेटलिफ्टिंगमध्ये जिल्ह्यात बाजी, विभागीय स्पर्धेसाठी निवड

कुस्ती अन् वेटलिफ्टिंगमध्ये जवळे विद्यालयाचा दबदबा!

१२ कुस्तीपटू जिल्हास्तरावर; गौरी यंपेची वेटलिफ्टिंगमध्ये जिल्ह्यात बाजी, विभागीय स्पर्धेसाठी निवड

सांगोला (तालुका प्रतिनिधी): कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले (सरकार) कनिष्ठ महाविद्यालय, जवळे येथील विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर घातली आहे. सन २०२६-२७ च्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याचबरोबर जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कु. गौरी जितेंद्र यंपे हिने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमधील या उल्लेखनीय कामगिरीमुळे जवळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील भक्कम परंपरेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

सांगोला तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत जवळे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध वयोगट आणि वजनगटांत उत्कृष्ट कामगिरी केली. १४ वर्षे मुलींच्या ३३ किलो वजनी गटात ज्ञानेश्वरी संतोष सरगर हिने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.१७ वर्षे मुलींच्या गटात ४३ किलो वजनी गटात ऋतुजा नवनाथ भजनावळे, ४९ किलो वजनी गटात संस्कारी काकासो गावडे आणि ५७ किलो वजनी गटात पूजा म्हाळू बुरंगे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. याच गटातील ५३ किलो वजनी गटात मयुरी तानाजी आगलावे हिने तृतीय क्रमांक मिळवला.१९ वर्षे मुलींच्या गटात ५० किलो वजनी गटात गौरी जितेंद्र यंपे हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर ५३ किलो वजनी गटात अक्षदा काकासो गावडे हिने तृतीय क्रमांक मिळवला.१७ वर्षे मुलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५५ किलो वजनी गटात प्रणय मस्के, ६० किलो वजनी गटात संस्कार बुरंगे आणि ८० किलो वजनी गटात पियुष गावडे यांनी प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेतील स्थान निश्चित केले. तर १९ वर्षे मुलांच्या ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये ५५ किलो वजनी गटात यशवंत आगलावे, ६३ किलो वजनी गटात हेमंत आगलावे, ८२ किलो वजनी गटात ओम कोडक आणि ९४ किलो वजनी गटात दीपक सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

कुस्तीतील यशाची मालिका सुरू असतानाच जवळे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वेटलिफ्टिंगमध्येही आपली ताकद सिद्ध केली. जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत इयत्ता बारावीतील कु. गौरी जितेंद्र यंपे हिने १९ वर्षांखालील ४८ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीमुळे तिची विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच इयत्ता अकरावीतील कु. पूजा म्हाळू बुरंगे हिने १७ वर्षांखालील ५६ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली. कुस्ती आणि वेटलिफ्टिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सराव, योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते जिल्हा तसेच विभागीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, हे या यशातून अधोरेखित झाले आहे.

या यशामागे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अशोक पाटील, विजय चडचणकर आणि विजय लांडगे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. तसेच कुस्ती व वेटलिफ्टिंगसाठी प्रशिक्षक कुलभूषण देशमुख यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, नियमित सराव आणि स्पर्धात्मक तयारी करून घेतली. खेळाडूंच्या मेहनतीला प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने हे यश शक्य झाले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्या विकास मंडळ, जवळे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, उपाध्यक्ष अरुणभाऊ घुले आणि सचिव सुभाष लऊळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच प्रशिक्षक व क्रीडाशिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब शिंदे, उपमुख्याध्यापक प्रशांत गोरे आणि पर्यवेक्षक संतोष शेटे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनीही यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले. जिल्हास्तरीय तसेच आगामी विभागीय स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करावी, यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!