गुन्हेगारी

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाच्या अंगावरील २ लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

महूद-दिघंची मार्गावर धक्कादायक प्रकार; दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाच्या अंगावरील २ लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

महूद-दिघंची मार्गावर धक्कादायक प्रकार; दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला (प्रतिनिधी): महूद ते दिघंची-आटपाडी मार्गावर पोलिस असल्याची बतावणी करून एका ६९ वर्षीय वृद्धाला अडवून त्याच्या अंगावरील तब्बल २ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवरून येत वृद्धाला रस्त्यात अडविले. ‘आम्ही पोलीस आहोत, तुमची झडती घ्यायची आहे,’ असे सांगत संवाद सुरू केला. त्यानंतर त्यापैकी एका इसमाने रुमाल वृद्धाच्या तोंडावर फिरविल्यानंतर काही काळ आपल्याला काहीच कळले नाही, अशी फिर्याद वृद्धाने सांगोला पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे महूद परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीच्या हालचालींबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
कटफळ येथील हरिदास साधू बंडगर (वय ६९) हे ३० सप्टेंबर रोजी महूद येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपून दुपारी सुमारे चार वाजता ते मोटारसायकलवरून कटफळकडे निघाले होते. महूद ते दिघंची-आटपाडी मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ पोहोचताच मागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडविले. ‘गाडी साईडला घ्या, आम्ही पोलीस आहोत. तुमची झडती घ्यायची आहे,’ असे त्यांनी सांगितले.
‘माझी झडती कशासाठी? मी काय केले आहे?’ असा सवाल बंडगर यांनी केला. त्याच क्षणी पुढे बसलेल्या इसमाने हातातील रुमाल त्यांच्या तोंडावर फिरविला. त्यानंतर वृद्धाला काहीच कळाले नाही. काही वेळाने भानावर आल्यानंतर गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील सोन्याची अंगठी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणातच विश्वासाचा गैरफायदा घेत दोन अनोळखी इसमांनी सोन्यावर हात साफ केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेत वृद्धांच्या हातातील १ लाख रुपये किमतीची १७ ग्रॅम सोन्याची अंगठी, १ लाख ८० हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची सोन्याची चैन असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घडलेला प्रकार लक्षात येताच बंडगर यांनी मुलगा संभाजी याला फोन करून माहिती दिली. संभाजी घटनास्थळी आल्यानंतर दोघांनी महूद, कटफळ तसेच पंढरपूर, अकलूज आणि सांगोला रोड परिसरात संशयितांचा शोध घेतला. मात्र मोटारसायकलवरून आलेले ते दोन्ही अनोळखी इसम कुठेच आढळले नाहीत. अखेर शोध घेऊनही संशयितांचा मागमूस न लागल्याने बंडगर यांनी मुलासह सांगोला पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. महूद परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस असल्याचे सांगून रस्त्यात अडवणाऱ्या अनोळखी व्यक्तींबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!