कासेगावात मध्यरात्री घरफोड्यांचा धुमाकूळ; स्थानिक गुन्हे शाखेने सराईत टोळीला घातल्या बेड्या!
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा छडा; घरफोडी व जबरी चोरीतील आरोपी अटकेत सोन्याचे दागिने, रोख रक्कम, इरकल साड्या व मोटारसायकलीसह ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त
कासेगावात मध्यरात्री घरफोड्यांचा धुमाकूळ; स्थानिक गुन्हे शाखेने सराईत टोळीला घातल्या बेड्या!
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा छडा; घरफोडी व जबरी चोरीतील आरोपी अटकेत
सोन्याचे दागिने, रोख रक्कम, इरकल साड्या व मोटारसायकलीसह ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त
सांगोला (प्रतिनिधी): दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास सलग तीन ते चार घरफोड्या करून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, इरकल साड्या तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कासेगाव परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बातमी कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर येथे अज्ञात चोरट्यांनी तीन ते चार घरांमध्ये घरफोडी करून चोरी केली होती. या घटनेप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१ (३), ३३१ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरफोड्यांच्या या मालिकेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कासेगाव येथील घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासताना घटनेच्या मध्यरात्री तीन संशयित व्यक्ती परिसरात फिरताना आढळून आल्या.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयाची दिशा निश्चित करण्यात आली. कासेगाव येथील घरफोडीचा गुन्हा नितीन बाबू भोसले, कमलाकर यशवंत पवार व त्यांचे साथीदार यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने बिस्मिल्लानगर, मुळेगाव, सोलापूर येथे शोधमोहीम राबवली. यावेळी नितीन बाबू भोसले व कमलाकर यशवंत पवार हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता कासेगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कौशल्यपूर्ण तपासादरम्यान आरोपींकडून इतर गुन्ह्यांचीही माहिती मिळाली.
आरोपींकडून कासेगाव येथील गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ३ ग्रॅम ४८ मिली सोन्याचे दागिने, ४५ हजार रुपयांची रोख रक्कम, २० हजार रुपये, सुमारे ३ हजार रुपयांच्या इरकल साड्या तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी नितीन बाबू भोसले हा वळसंग पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे. तर कमलाकर यशवंत पवार याच्याविरुद्ध वळसंग, तामलवाडी, अक्कलकोट उत्तर, मोहोळ तसेच कर्नाटकातील आदर्शनगर विजापूर पोलीस ठाण्यात घरफोडी व चोरीसह विविध गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. त्यामुळे आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी अभिलेखाचीही तपास यंत्रणेकडून पडताळणी केली जात असून, त्यांच्या सहभागातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपासातून पडताळली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, अजय भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे-पाटील, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे, पोलिस कॉन्स्टेबल किरण चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल अनवर अत्तार, पोलिस कॉन्स्टेबल सुनंदा झळके, चापो कॉन्स्टेबल दिलीप थोरात तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शशीकांत काळेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सीसीटीव्ही विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या तपास कौशल्याच्या आधारे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत सराईत आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.



