राजकीय

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ सांगोला भाजपच्या वतीने खा.संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ सांगोला भाजपच्या वतीने खा.संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन

सांगोला (प्रतिनिधी): राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल, बेजबाबदार व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, सांगोला यांच्या वतीने वासूद चौक येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करत पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केले.

या आंदोलनात भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब एरंडे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, बाळासाहेब काटकर, सुदर्शन इंगवले, मंडल अध्यक्ष विजय मगर, मंडल अध्यक्ष दादासाहेब खरात, बाळासाहेब झपके, पोपट गडदे, प्रशांत वलेकर, नंदकुमार दिघे, विजय बाबर, विजय इंगोले, सुभाष पवार, सिद्धेश्वर गाडे, प्रवीण जानकर, गोटू इमडे, ॲड सुशांत फुले, उल्हास धायगुडे तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी खा.संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून पुतळा दहन केले. तसेच त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवून भविष्यात अशा बेजबाबदार विधानांपासून परावृत्त होण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी बोलताना चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, जयकुमार गोरे हे जनतेच्या विश्वासावर उभे असलेले विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याच्या बळावर अशा बेताल वक्तव्यांना लोकशाही मार्गाने ठाम उत्तर देईल. आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनाच्या शेवटी भाजपच्या वतीने जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अशा बिनबुडाच्या आरोपांविरोधात भविष्यातही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!