सांगोल्यात भरदिवसा धाडसी चोरी! कारची काच फोडून चार लाखांची रोकड लंपास
भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ; पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

सांगोल्यात भरदिवसा धाडसी चोरी! कारची काच फोडून चार लाखांची रोकड लंपास
भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ; पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
सांगोला (प्रतिनिधी): पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या कारची काच फोडून तब्बल चार लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धाडसी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. साई गणेश गॅस एजन्सीसमोर भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यलमर मंगेवाडी (ता. सांगोला) येथील अमोल सखाराम येलपले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी अर्चना यांच्यासह सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मित्राची एमएच १३ बीएन ७७९१ क्रमांकाची चारचाकी गाडी घेऊन सांगोला येथील आयसीआयसीआय बँकेत गेले होते. तेथून त्यांनी चार लाख रुपये काढले. ही रोकड प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून चारचाकी वाहनात ठेवली.
त्यानंतर दोघेही मार्केट यार्ड परिसरातील एचपी गॅस सेंटर येथे गेले. अमोल येलपले हे गाडी लॉक करून पत्नीसह गाडीतून उतरले. त्यानंतर अमोल हे गॅस ट्रान्सफरच्या कामासाठी एजन्सीच्या कार्यालयात गेले. तर त्यांच्या पत्नी अर्चना या थोड्या अंतरावर थांबल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काही क्षणांत कारची काच फोडून आत ठेवलेली चार लाख रुपयांची रोकड घेऊन भरधाव वेगाने पसार झाले. गाडीची काच फुटल्याचे दिसताच अर्चना यांनी गाडीकडे जाऊन पाहिले असता त्यांना पैशाची बॅग दिसली नाही. घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे.
भरदिवसा गजबजलेल्या भागात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी, नागरिक आणि वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.



