राजकीय

सांगोल्यात मतमोजणीला सज्ज यंत्रणा; महायुती विरुद्ध तालुका विकास आघाडीची हायव्होल्टेज लढत

मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात ?, सत्तेसाठी रणसंग्राम; दिग्गज नेत्यांची मोर्चेबांधणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

सांगोल्यात मतमोजणीला सज्ज यंत्रणा; महायुती विरुद्ध तालुका विकास आघाडीची हायव्होल्टेज लढत

मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात ?, सत्तेसाठी रणसंग्राम; दिग्गज नेत्यांची मोर्चेबांधणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीने संपूर्ण राजकीय वातावरण तापले असून सत्तास्थापनेसाठी दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. प्रत्येक गटात प्रतिष्ठेची, तर काही ठिकाणी अस्तित्वाची लढाई रंगली असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी बी. आर. माळी आणि नायब तहसीलदार बाळुताई भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून २० टेबलवर ईव्हीएमवरील मतांची, तर ३ टेबलवर पोस्टल मतदानाची मतमोजणी होणार आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण आणि प्रशासकीय सतर्कतेत मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीविरुद्ध शेकाप व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सांगोला तालुका विकास आघाडी यांच्यात थेट आणि हायव्होल्टेज लढत झाली. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), रासप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी, बसपा आणि वंचित बहुजन आघाडी यांनीही उमेदवार उभे केल्याने राजकीय गणिते अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.

जवळा जिल्हा परिषद गटात माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे सुपुत्र सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुंखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील यांनी माघार घेतल्यानंतर येथे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महायुती आकारास आली असून या गटाचा निकाल संपूर्ण तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा मानला जात आहे.

चोपडी जिल्हा परिषद गटात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, विकास आघाडीचे विजयकुमार शिंदे आणि अपक्ष उल्हास धायगुडे यांच्यात थेट लढत झाली. महूद गटात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, आघाडीचे बाळासाहेब ढाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे उत्तम खांडेकर यांच्यात तिरंगी सामना रंगला.

कडलास गटात युवा नेते योगेशदादा खटकाळे यांच्या मातोश्री शोभाताई खटकाळे, सांगोला तालुका विकास आघाडीच्या संगीता शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संचिता टापरे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई झाली. तर कोळा गटात भाजपचे उमेदवार व माजी सभापती संभाजी आलदर यांच्या विरोधात विकास आघाडीचे किरण पांढरे यांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. काही गट व गणांमध्ये अपक्ष उमेदवारांनीही राजकीय समीकरणे बिघडवत निकालावर प्रभाव टाकला आहे.

प्रचारादरम्यान पाणी, वीज, रस्ते, शेतीचे प्रश्न आणि विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोपांची झड झाली. नेत्यांची प्रतिष्ठा, कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या अपेक्षा या साऱ्यांचा कस लागलेली ही निवडणूक सांगोल्याच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरणार आहे.

सत्तेची चावी कुणाच्या हाती जाणार, हे निकालातून स्पष्ट होणार असून सांगोला तालुक्याची धडधड वाढली आहे. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांची धुमश्चक्री, स्थानिक प्रश्नांवरून झालेली टीका-टिप्पणी आणि शेवटच्या टप्प्यातील मतदारांशी थेट संपर्कामुळे वातावरण तापले होते. पाणी, वीज, रस्ते, शेतीचे प्रश्न आणि विकासाच्या मुद्यांवर मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात पडतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. निकालातून कोणाची सरशी ठरणार, हे काही तासांत स्पष्ट होणार असून सांगोल्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!