महाराष्ट्रसामाजिक

सोलापूर ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचा आढावा; ग्रामपंचायतींनी योजनांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी

सोलापूर ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचा आढावा; ग्रामपंचायतींनी योजनांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी

सांगोला (प्रतिनिधी): जिल्हा परिषदअंतर्गत जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता काटकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख तसेच सर्व तालुक्यांतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या सद्यस्थितीचा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सविस्तर आढावा घेतला. जल जीवन मिशनमधील निविदा चौकशी समितीच्या आक्षेपांमुळे 189 कामांची देयके प्रलंबित असल्याबाबतही यावेळी माहिती घेण्यात आली.

सांगोला, अक्कलकोट व बार्शी तालुक्यांतील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची तपशीलवार माहिती घेऊन या योजना पूर्ण न होण्यामागील कारणांचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. संबंधित ठेकेदारांना कामाची रक्कम देण्याबाबत पालकमंत्र्यांशी विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जल जीवन मिशनच्या कामांसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी. अपूर्ण पाणीपुरवठा योजनांमध्ये अनेक ठिकाणी विहीर व पाण्याच्या टाकीसाठी ग्रामपंचायतींकडून आवश्यक जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याचे आढळून आले आहे. ज्या ग्रामपंचायती पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देत नाहीत, त्यांच्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तातडीने सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

थकबाकीमुळे बंद योजना सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करा. महावितरणच्या थकबाकीमुळे ज्या पाणीपुरवठा योजना बंद आहेत, त्याबाबत आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन या योजना सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शिरभावी पाणीपुरवठा योजनेचा आढावासांगोला तालुक्यातील 82 गावांसाठी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिरभावी पाणीपुरवठा योजनेचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेची सद्यस्थिती, प्रलंबित कामे तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!