इच्छुकांची कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी धावपळ
भट्टीच्या कपड्यांना ऊन, वारा आणि पावसाचा बसतोय फटका

इच्छुकांची कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी धावपळ
भट्टीच्या कपड्यांना ऊन, वारा आणि पावसाचा बसतोय फटका
‘अभी नहीं तो कभी नहीं’ उमेदवारांची धावपळ सुरू
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे इच्छुकांची रंगीत तालीम सध्या सुरू आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांची विविध कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. यामुळे इच्छुकांची चढाओढ पहावयास मिळत आहे आणि उपस्थितांना चर्चेसाठी विषय मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
लग्नसमारंभ, वाढदिवस, सत्कार समारंभ, शिबिरे, अंत्यविधी, पुण्यस्मरण आणि युवकांचे एकत्र वाढदिवस अशा विविध कारणांनी इच्छुकांची कार्यक्रमांमध्ये हजेरी वाढत आहे. त्यामुळे कार्यक्रमांना भेट देण्यासाठी इच्छुकांची धावपळ दिसून येत आहे. यामध्ये कोण कधी पोहचतो, किती वेळ थांबतो, आणि कार्यक्रमात किती सहभाग घेतो याकडे उपस्थितांचे लक्ष असते. कधी कुणाच्या सुख-दुःखात आणि आनंदात सहभागी नसणारे देखील सध्या कार्यक्रमांना उपस्थिती दाखवून काय कमी जास्त आहे का ? अशी विचारपूस देखील करताना दिसून येत आहेत.
सांगोला नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व गट-गणनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या राजकीय महत्त्वाकांक्षेने जोरदार तयारी सुरू केली आहे.
मतदारांशी संपर्क वाढवण्यावर उमेदवारांचा विशेष भर आहे. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून अनेक इच्छुकांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. कधीतरी गावात दिसणारे आता बऱ्याचदा गावात येत नागरिकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. तर रोज गावात असणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेताना दिसून येत आहेत.
कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी इच्छुकांना भट्टीचे कपडे, चारचाकी वाहन आणि कार्यकर्ते या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सध्या भट्टीच्या कपड्यांचा खर्च वाढलेला आहे. याशिवाय कार्यक्रमासाठी दूरवर जावे लागते, त्यामुळे पेट्रोल, डिझेलचा खर्चदेखील वाढतो. कार्यकर्त्यांचा देखील खर्च येतो.गावातील कट्ट्यांवर चर्चाना ऊत आला आहे. गावात काही जण जे घराच्या समोरुन जायचे पण कधीही विचारपूस करत नव्हते, ते आता घराचे उंबरे झिजवत आहेत. वेळोवेळी घरी येत विचारपूस करत आहेत. तसेच शहरातील चौकात, कट्ट्यांवर चर्चा रंगताना दिसत आहेत. निवडणुकीच्या काळात मटण, दारू आणि पैशांचा मोठा वापर होतो. परंतु काही इच्छुकांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. महत्वाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलावून जेवणावळी आणि गरजूंना आर्थिक मदत देत आहेत. त्यातून निवडणुकीत आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

निवडणुकांमध्ये पूर्वापार अर्थकारण चालत आल्यामुळे मतदारही आता मतदानासाठी सहसा तसे बाहेर पडत नाही. त्यामुळे उमेदवाराला खर्च करताना आपल्या हक्कांच्या मतांबरोबर अपेक्षित मते मिळविण्यासाठी खर्च करताना एक सदस्यीय पद्धतच सोयीची वाटते. बहुसदस्य पद्धतीमुळे प्रभागातील मतदारांचा आकडा वाढणार असल्याने इच्छुकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अमर्याद अर्थकारणाला खीळ बसण्याची शक्यता असली तरी निवडणुकीत पैशाचा खेळ होणार हे नक्की.
सर्वच राजकीय पक्षांमध्ये सांगोला नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांची वर्दळ वाढली असून राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेतृत्व तयार झाले आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी विजयाची खात्री असणारे तगडे उमेदवार निवडताना सर्वच राजकीय पक्षांची तारांबळ उडणार आहे. नगराध्यक्षपदासाठी सर्वच पक्षांमधून दावेदारी सांगितली जात आहे. माजी नगरसेवक-नगरसेविकांसह नवोदित चेहऱ्यांनी इच्छुक म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली दावेदारी सांगितली आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात स्थानिक राजकारणातील फाटाफूट, शेकाप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राजकीय समीकरणांसह अनेकांची राजकीय गणिते बदलणार आहेत. कार्यकर्त्यांच्या महत्वकांक्षा वाढल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना एकीकडे कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्याबरोबरच मतदारांनाही खूष करण्यासाठी दुहेरी कसरत करावी लागणार आहे.



