कुर्डवाडीत MD ड्रग्जसह तरुण जेरबंद; 9.89 लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; 63 ग्रॅम मेफेड्रोनसह चारचाकी व मोबाईल पोलिसांच्या ताब्यात

कुर्डवाडीत MD ड्रग्जसह तरुण जेरबंद; 9.89 लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; 63 ग्रॅम मेफेड्रोनसह चारचाकी व मोबाईल पोलिसांच्या ताब्यात
कुर्डुवाडी (प्रतिनिधी): कुर्डुवाडी शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने मेफेड्रोन (MD) हा अंमली पदार्थ घेऊन येणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व कुर्डुवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून अटक केली. सोहेल अमर मुलाणी (वय 28, रा. खाटीक गल्ली, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 63 ग्रॅम मेफेड्रोन (MD), चारचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण 9 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे कुर्डुवाडी परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्री होत असल्याचे दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाला आळा घालण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडूनही अंमली पदार्थांविरोधात जनजागृती आणि कायदेशीर कारवाई अशी दुहेरी मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, 18 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली N-Cord समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला कुर्डुवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रोन (MD) या अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सोहेल मुलाणी हा करमाळा रोडवरून कुर्डुवाडी शहराच्या दिशेने चारचाकी वाहनातून MD ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी ही माहिती गांभीर्याने घेत कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांना पथकासह कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले
त्यानुसार कुर्डुवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करमाळा रोडवर सापळा रचला. पोलिसांचे पथक संशयिताच्या येण्याची वाट पाहत असताना करमाळा रोडवरून कुर्डुवाडीच्या दिशेने एक चारचाकी वाहन येताना दिसले. वाहनातील इसम बातमीतील व्यक्ती असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सतर्क होत त्याला जागीच ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव सोहेल अमर मुलाणी, वय 28 वर्षे, रा. खाटीक गल्ली, कुर्डुवाडी असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 63 ग्रॅम मेफेड्रोन (MD) आढळून आले. या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 1 लाख 89 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण 9 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी सोहेल अमर मुलाणी याच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 426/2026 दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर NDPS Act 1985 मधील कलम 8(क) व 22(क) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता 24 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ, कुर्डुवाडी पोलीस ठाणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, करमाळा उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस., स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकुळ, पोलीस हवालदार सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप थोरात तसेच कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुशांत शर्शीदे, संतोष मोरे, महिला पोलीस हवालदार फुलन कस्तुरे, पोलीस कॉन्स्टेबल समीर पठाण आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे यांनी सहभाग घेतला.



