गुन्हेगारी

भोंदूबाबा मनोहर उर्फ मामा भोसले व दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

भोंदूबाबा मनोहर उर्फ मामा भोसले व दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

सोलापूर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर उर्फ ‘मामा’ भोसले व दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीविरूध्द दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अघोरी पूजा, धार्मिक विधी व श्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या कथित टोळीला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात मनोहर मामा भोसले, त्याचा प्रमुख साथीदार विशाल उर्फ नाथबाबा वाघमारे तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ आणि माया झोळ यांच्यासह एकूण २४ आरोपी तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कुर्डुवाडी पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गु.र.नं. १९२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्ये आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू अधिनियम, २०१३ मधील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, मनोहर मामा भोसले याच्या मठामध्ये होणाऱ्या कथित अघोरी पूजाविधी तसेच पैशांच्या व्यवहारावर आरोपी नरेंद्र बाळासाहेब सांगळे, रा. वेळू, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर याची भूमिका असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार त्यालाही अटक करण्यात आली होती. मनोहर मामा याच्या सांगण्यावरून भक्तांकडून रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने देणगीच्या स्वरूपात रक्कम स्वीकारणे, आरोपी मनोहर मामा भोसले यांचे सांगणेवरुन भक्तांकडून देणगी स्वरुपात रोखीने, ऑनलाईन पध्दतीने रक्कमा स्विकारून त्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे, प्रत्यक्षात हा पैसा वापरून तो कायदेशीर करून देणारे असे एकूण २४ आरोपी तपासामध्ये निष्पन्न झाले होते.

पोलिसांच्या तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रा.रामदास झोळ व माया झोळ यांची दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोळी येथे दत्तकला शिक्षण संस्था आहे. आरोपी मनोहर भोसले याच्या सांगण्यावरून संघटीत गुन्हेगारी करीता पिडीत लोकांची फसवणुकीतील रोख रक्कमा घेवुन सदरच्या रक्कमा कायदेशीर करणेकरीता दत्तकला शिक्षण संस्थेत घेवून येवून ती रक्कम कायदेशीर करून ती परत मनोहर मामा यास पुरवत होते. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची साखळी, पैशांचा स्रोत आणि त्याची विल्हेवाट याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान २५ एप्रिल २०२६ रोजी मुख्य आरोपी मनोहर मामा भोसले आणि त्याचा सहकारी विशाल उर्फ नाथबाबा वाघमारे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासाचा विस्तार करत पोलिसांनी कथित आर्थिक व्यवहारांशी संबंधित इतर व्यक्तींचीही चौकशी केली. तपासातून एकामागून एक आरोपींची नावे समोर येत गेली आणि अखेर एकूण २४ आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोहर मामा भोसले याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. पूर्वीच्या एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला आणि त्यानंतरही कथित गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवल्याचा आरोप आहे. या कथित गुन्हेगारी कृत्यांतून आर्थिक फायदा मिळवून स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे.

या टोळीच्या कथित संघटित गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्कातील तरतुदींचा अंतर्भाव करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, रंजन कुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पातळीवर होणार असून कथित टोळीची आर्थिक व संघटित गुन्हेगारीची व्याप्ती तपासली जाणार आहे.

अघोरी पूजा, धार्मिक विधी आणि विविध प्रकारचे आमिष दाखवून गोरगरीब नागरिकांकडून आर्थिक रक्कम उकळल्याचा आरोप या प्रकरणातील आरोपींवर करण्यात आला आहे. या कथित प्रकारामुळे सोलापूर ग्रामीण, पुणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.
या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास श्रीमती अंजना कृष्णा, सहायक पोलीस अधीक्षक, करमाळा उपविभाग करीत आहेत. आरोपींचे आर्थिक व्यवहार, कथित टोळीची रचना, पैशांचा प्रवाह, मालमत्ता खरेदी आणि अन्य संबंधित बाबींचा तपास सुरू आहे.

 

अघोरी पूजा, जादूटोणा किंवा धार्मिक विधींच्या नावाखाली कोणी नागरिकांची फसवणूक करत असल्यास अथवा आर्थिक लूट करत असल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

 

 

श्रद्धेच्या नावाखाली आर्थिक शोषण करणाऱ्यांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारण्यात आल्याने भोंदू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले व दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांच्या टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याने आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!